बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता भारतातील देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणारे क्रिकेटपटूही मालामाल होणार आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
अशा स्थितीत आता पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सामनावीर आणि टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू या रूपात बक्षीस रक्कम मिळेल. याशिवाय ज्युनियर स्तरावरील स्पर्धांमध्येही क्रिकेटपटूंना सामनावीर आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरविण्यात येईल आणि त्यांना मोठी बक्षीस रक्कम दिली जाईल.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक्सवर पोस्ट करून सांगितले आहे, की "आमच्या देशांतर्गत क्रिकेट कार्यक्रमांतर्गत, आम्ही सर्व महिला आणि ज्युनियर क्रिकेट स्पर्धांमध्ये सामनावीर आणि टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूंसाठी बक्षीस रकमेची तरतूद करणार आहोत. याशिवाय, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली सिनियर पुरुष स्पर्धेतील सामनावीरासाठी बक्षीस रक्कम दिली जाईल.
जय शहा पुढे म्हणाले, की “या उपक्रमाचा उद्देश डोमेस्टिक सर्किटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे ओळखणे आणि बक्षीस देणे हा आहे. या उपक्रमात पाठिंबा दिल्याबद्दल सर्वोच्च परिषदेचे मनःपूर्वक आभार. आम्ही एकत्रितपणे आमच्या क्रिकेटपटूंसाठी चांगले वातावरण तयार करत आहोत. जय हिंद... ”
जय शाह यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडिया युजर्स लाईक आणि कमेंट करून आपला अभिप्राय देत आहेत.
गेल्या वर्षी बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केली होती आणि रणजी करंडक विजेत्या संघाला तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते.
इराणी चषक स्पर्धेतील विजेत्यांना २५ लाखांऐवजी ५० लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
दुलीप करंडक स्पर्धेतील विजेत्या संघाला आता १ कोटी आणि उपविजेत्या संघाला ५० लाख, विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्या संघाला १ कोटी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम संघाला ५० लाख रुपयांचा धनादेश दिला जातो.