काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्याची ऑफर दिली होती. टीम इंडियाची इच्छा असल्यास, ते दिल्ली किंवा चंदीगडमध्ये आपला सेटअप करू शकतात आणि तेथून त्यांनी पाकिस्तानमध्ये सामना खेळण्यासाठी यावे आणि सामन्यानंतर लगेच आपल्या देशात परत जावे, असे या ऑफरमध्ये म्हटले होते.
पण बीसीसीआयने पीसीबीची ही ऑफर स्पष्टपणे नाकारल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, भारतीय बोर्डाला पीसीबीकडून असा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याचा निर्णय पूर्णपणे भारत सरकारच्या हातात आहे.
याशिवाय, पीसीबीकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु असा दावा करण्यात आला की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आधीच माहिती होती की भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी त्यांच्या देशात येण्यास नकार देऊ शकतो. परंतु पीसीबी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास अजिबात तयार नाही.
काही दिवसांपूर्वी आयसीसीचे काही अधिकारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानात आले होते. आता १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान दुबईत ICC बोर्ड सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीबाबत पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या देशात आयोजित करायची आहे.
तसेच, या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलही पाकिस्तानातच व्हावी, अशीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. मग भारतीय संघ पाकिस्तानात येईल किंवा नाही. पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचे यजमानपद कोणत्याही परिस्थितीत गमावायचे नाही, असेही सांगण्यात आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार, भारताचे सर्व सामने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत आणि या मैदानाला फायनलसाठीही मान्यता देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या