भारतीय क्रिकेट संघाने बार्बाडोसच्या भूमीवर इतिहास रचला. टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया शनिवारी (२९ जून) चॅम्पियन बनली.
पण चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया अद्याप भारतात परतली नाही, वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकून पडली आहे.
दरम्यान, आता भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चॅम्पियन टीम इंडिया बार्बाडोस सोडून भारतात कधी पोहोचेल याबाबत माहिती समोर आली आली आहे.
वादळामुळे भारतीय संघाला बार्बाडोस सोडता आले नाही. मात्र, आता बीसीसीआयने भारतीय संघाला तेथून बाहेर काढण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. टीम इंडिया बार्बाडोसच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता बीसीसीआयच्या विशेष विमानाने भारतासाठी रवाना होईल. टीम इडिया बुधवारी संध्याकाळी ७.४५ वाजता दिल्लीला पोहोचेल.
याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियासोबतच भारतात परतणार असल्याचे आश्वासन दिले होते. आता बीसीसीआयच्या सर्व प्रयत्नांनंतर टीम इंडियाची भारतात परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
भारतीय संघाने बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. टीम इंडियाचा हा दुसरा टी-२० विश्वचषक होता. २००७ मध्ये भारताने पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर भारताला या फॉरमॅटचे दुसरे जेतेपद पटकावण्यास १७ वर्षे लागली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषकाचे पहिले विजेतेपद पटकावले. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाला दुसरे विजेतेपद मिळाले आहे.
टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले, पण यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलच्या बळावर भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. विराट कोहलीने ५९ चेंडूत सर्वाधिक ७६ धावा केल्या.
त्याचवेळी भारताच्या १७६ धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने ७ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत सर्वाधिक ५२ धावा केल्या, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.
संबंधित बातम्या