भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेनंतर ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण आता या मालिकेत एक महत्त्वाचा बदल झाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाचे नवीन वेळापत्रक शेअर केले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना यापुढे धर्मशाला येथे खेळवला जाणार नाही, असे बीसीसीआयने म्हटले आहे. आता हा सामना ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
नुकतेच ग्वाल्हेरमध्ये नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले आहे. बीसीसीआयने भारत-इंग्लंड मालिकेतही बदल केले आहेत.
वास्तविक, भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे होणार होता. मात्र येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अपग्रेडेशन करण्याचे काम सुरू आहे. या कारणास्तव पहिला T20 सामना ग्वाल्हेरला हलवण्यात आला आहे.
ग्वाल्हेरमध्ये श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियम तयार आहे. हे या शहरातील नवीन स्टेडियम आहे. त्यामुळे आता येथे भारत-बांगलादेशचा पहिला टी-20 सामना खेळवला जाणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून चेन्नईत तर दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. दुसरा सामना दिल्लीत तर तिसरा सामना हैदराबादमध्ये खेळवला जाईल.
भारत-इंग्लंडच्या वेळापत्रकातही बदल
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतही बदल करण्यात आला आहे. खरं तर, इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी २०२५ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. येथे त्याला ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.s
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना २२ जानेवारीला आणि दुसरा २५ जानेवारीला होणार आहे. पहिला सामना चेन्नईत तर दुसरा सामना कोलकात्यात खेळवला जाणार होता. मात्र आता दोन्ही सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्यात आली आहे. म्हणजेच आता पहिला सामना कोलकात्यात तर दुसरा सामना चेन्नईत होणार आहे.