Indian team for the first test against Bangladesh : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे.
वेगवान गोलंदाज यश दयाल याचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आलेली नाही. तो कसोटी सामना खेळणार आहे.
भारतीय संघाला २७ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळायची आहे. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेशिवाय भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ टी-20 सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघाची निवड झालेली नाही.
चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी BCCI ने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंत, केएल राहुल आणि सरफराज खान यांनाही या संघात संधी मिळाली आहे. तर श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालेले नाही.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी १६ सदस्यीय संघात ४ फिरकीपटू आणि ४ वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. २ यष्टिरक्षकांसह एकूण ८ फलंदाज आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
पहिला कसोटी सामना - १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर, सकाळी ९.३०, चेन्नई
दुसरा कसोटी सामना - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, सकाळी ९.३०, कानपूर
पहिला T20 सामना - ६ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, धर्मशाला
दुसरा T20 सामना - ९ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, दिल्ली
तिसरा T20 सामना - १२ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, हैदराबाद