BCCI 10 Points Policy All Rules : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी १० नवीन नियम जारी केले आहेत, जे सर्व भारतीय खेळाडूंना पाळणे अनिवार्य असेल. याचे उल्लंघन केल्यास खेळाडूंना कठोर शिक्षाही होऊ शकते.
नियमांचे उल्लंघन केल्यास पगार कपातीपासून ते आयपीएल खेळण्यास बंदी यांसारख्या शिक्षांचा समावेश आहे. खरे तर संघात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हे सर्व केले गेले आहे.
भारतीय राष्ट्रीय संघाकडून खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत समावेश आहे. या सर्वांना देशांतर्गत क्रिकेटशी नियमितपणे संपर्कात राहावे लागेल. जर एखाद्या खेळाडूला काही अडचणींमुळे हे करता येत नसेल तर त्याला मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची परवानगी घ्यावी लागेल.
सर्व खेळाडूंनी एकत्र प्रवास करणे बंधनकारक असेल, मग ते एखाद्या सामन्यासाठी किंवा सराव सत्रासाठी प्रवास करत असतील. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसह प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
खेळाडूंना प्रवासादरम्यान जास्त सामान नेण्यास मनाई असेल. खेळाडू आता एकाच प्रवासात १५० किलोपर्यंतचे सामान आणि सपोर्ट स्टाफला ८० किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतात. जर कोणत्याही खेळाडूने या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला स्वतः पैसे भरावे लागतील.
बीसीसीआयच्या परवानगीशिवाय खेळाडू कोणत्याही दौऱ्यासाठी किंवा मालिकेसाठी वैयक्तिक कर्मचारी (व्यवस्थापक, कुक इ.) सोबत घेऊ शकत नाहीत.
भारतीय संघाच्या खेळाडूंना बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सला पाठवलेल्या उपकरणे आणि वैयक्तिक सामानाबाबत संघ व्यवस्थापनाशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे. एखाद्या खेळाडूला उपलब्ध व्यवस्थेव्यतिरिक्त काही अन्य सुविधा हव्या असतील तर त्याचा खर्च त्याला स्वतः करावा लागेल.
एनसीएमध्ये येण्यापूर्वीच काही सिनीयर खेळाडू आपली उपकरणे किंवा किट पाठवून देतात. अशा परिस्थितीत, त्याच्या देखभालीची जबाबदारी सेंटर ऑफ एक्सलन्सवर येते, ज्यासाठी खेळाडू कोणतेही पैसे देत नाहीत, परंतु आता ते असे करू शकणार नाहीत.
सर्व खेळाडूंना सराव सत्रात सहभागी व्हावे लागेल आणि मुक्कामाच्या ठिकाणापासून मैदानापर्यंत एकत्र प्रवास करावा लागेल. संघात एकता आणण्यासाठी हे केले गेले आहे.
कोणतीही मालिका सुरू असेल किंवा संघ परदेश दौऱ्यावर असेल. अशा परिस्थितीत, खेळाडूंना वैयक्तिक जाहिरात शूट करण्याचे किंवा प्रायोजकांसोबत काम करण्याचे स्वातंत्र्य नसेल.
जर भारतीय संघ ४५ दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असेल. अशा परिस्थितीत खेळाडूचे कुटुंब केवळ दोन आठवडेच त्यांच्यासोबत राहू शकते. भेटीच्या कालावधीचा खर्च बीसीसीआय उचलणार असून, उर्वरित खर्च खेळाडूंना स्वत:ला करावा लागणार आहे.
BCCI द्वारे आयोजित केलेल्या शूट आणि इतर सर्व कार्यक्रमांसाठी खेळाडूंना उपलब्ध असणे आवश्यक आहे. यामुळे संघाप्रती खेळाडूंची एकजूट वाढण्यास तसेच क्रिकेट खेळाला चालना मिळण्यास मदत होईल.
सामना किंवा मालिका संपेपर्यंत सर्व खेळाडूंना एकत्र राहावे लागेल.
संबंधित बातम्या