BCA Women Cricket Tournaments: पुरुषांप्रमाणे आता भारतीय महिला क्रिकेटपटू देखील जगभरात तिरंगा फडकवत आहेत. अशाच प्रतिभावन महिला क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचा बडोदा क्रिकेट असोसिएशनने निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमेटमध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे. बडोदा हे १९७० च्या दशकात महिला क्रिकेट असोसिएशन असलेले देशातील पहिले शहर होते. मात्र, तरीही बीसीएची स्वतःची महिला व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा नाही. या वर्षापासून बीसीए महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची माहिती आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे म्हणाले की, "महिला क्रिकेट आता प्रचंड लोकप्रिय झाले आहे आणि या खेळात सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे. वडोदरामध्ये खूप प्रतिभा आहे आणि ती वापरण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही महिला क्रिकेट स्पर्धा सुरू करण्याचा विचार करत होतो. ही स्पर्धा नियमितपणे आयोजित केल्याने खेळाडूंना चांगला सराव मिळेल जे त्यांचे कौशल्य दाखवू शकतील. ते जितके जास्त खेळतील, तितका त्यांचा आत्मविश्वास वाढेल." याआधी बीसीए ज्युनियर क्रिकेटमध्ये मुले विरुद्ध मुलींचे सामने खेळले गेले.
महिला क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघासाठी तयार करण्याचा त्यांचा विचार असल्याचे बीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय महिला क्रिकेट संघात बडोदा शहरातील यस्तिका भाटिया आणि राधा यादव या दोन क्रिकेटपटू आहेत.बीसीएकडे अनुभवी महिला क्रिकेटपटू आहेत, ज्या दर्जेदार प्रशिक्षण देऊ शकतात आणि आमच्याकडे पुरेशी मैदाने देखील आहेत. व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची हीच वेळ आहे, असे बीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पूजा वस्त्राकर आणि राधा यादव यांच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५५ चेंडू राखून १० गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना १२ धावांनी जिंकला, तर दुसरा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. याआधी, एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवण्याबरोबरच भारताने एकमेव कसोटी सामनाही जिंकला होता.
संबंधित बातम्या