Hobart Hurricanes vs Sydney Thunder Highlights: ऑस्ट्रेलियान क्रिकेट लीग बिग बॅश लीगला नवा चॅम्पियन मिळाला आहे. BBL २०२४-२५ चा अंतिम सामना डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सिडनी थंडर आणि होबार्ट हरिकेन्स संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात होबार्ट हरिकेन्स संघाने एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
यासह होबार्ट हरिकेन्सने बिग बॅश लीगमधील पहिले विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले. होबार्ट हरिकेन्सने ७ वर्षानंतर बिग बॅश लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, यावेळी त्यांनी कोणतीही चूक केली नाही आणि विजेतपद जिंकले.
होबार्ट हरिकेन्ससाठी हा मोसम खूप संस्मरणीय होता. साखळी फेरीपासून ते बाद फेरीपर्यंत त्यांनी सर्वत्र वर्चस्व गाजवले. साखळी टप्प्यात १० पैकी ८ सामने जिंकले होते आणि फक्त २ सामने गमावले होते.
त्यामुळे ते पॉइंट टेबलमध्येही अव्वल स्थानावर राहिले. यानंतर त्यांनी क्वालिफायर सामन्यात सिडनी सिक्सर्सचा १२ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यातही होबार्ट हरिकेन्सने आपला फॉर्म कायम ठेवत विजेतेपदाच्या लढतीत सहज विजय मिळवला.
विजेतेपदाच्या लढतीत होबार्ट हरिकेन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत सिडनी थंडरने प्रथम फलंदाजी करताना २०- षटकांत ७ गडी गमावून १८२धावा केल्या.
यादरम्यान सलामीवीर जेसन संघाने ४२ चेंडूत सर्वाधिक ६७ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही ३२ चेंडूत ४८ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण बाकीचे फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत, त्यामुळे एका वेळी २०० हून अधिक धावा होतील, असे वाटत असताना सिडनी थंडरचा संघ केवळ १८२ धावांच करू शकला.
१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना होबार्ट हरिकेन्सची स्फोटक सुरुवात झाली. सलामीवीर मिचेल ओवेन याने आपल्या शतकी खेळीच्या जोरावर हे लक्ष्य अगदी सामान्य करून टाकले.
होबार्ट हरिकेन्सने पहिल्या ६ षटकात एकही विकेट न गमावता ९८ धावा केल्या आणि सामना एकतर्फी झाला. मिचेल ओवेनने ४८ चेंडूत २५७.१४ च्या स्ट्राईक रेटने १०८ धावा केल्या. त्याने ३९ चेंडूत शतक पूर्ण केले.
या खेळीत त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि ११ षटकार आले. त्यामुळे त्यांनी हे लक्ष्य १४.१ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. या झंझावाती खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
संबंधित बातम्या