Brisbane Heat vs Hobart Hurricanes : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगचा ३६ वा लीग सामना ब्रिस्बेन हीट आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात गेला. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून २०१ धावा केल्या.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना हॉबार्ट हरिकेन्सच्या डावाच्या चौथ्या षटकानंतर स्टेडियममध्ये अचानक आग लागली. यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून पंचांनी काही काळ खेळ थांबवला. आग पूर्णपणे विझल्यानंतर त्यांनी पुन्हा खेळ सुरू केला.
२०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना होबार्ट हरिकेन्स संघाने ४ षटकांचा खेळ संपल्यानंतर बिनबाद ४७ धावा केल्या होत्या. दरम्यान, स्टेडियममध्ये अचानक आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या. ही आग डीजे लावण्यात आला होता, त्या ठिकाणी लागली होती.
दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचे काम केले आणि परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीबीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमच्या एका स्टँडला लागलेल्या आगीमुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, यावेळी सर्व खेळाडू मैदानावर उपस्थित राहिले आणि काही वेळाने परिस्थिती सामान्य झाल्यावर खेळ पुन्हा सुरू करण्यात आला.
बिग बॅश लीग २०२४-२५ आता अंतिम टप्प्यात आहे आणि होबार्ट हरिकेन्सने या सामन्यापूर्वीच प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित केले होते. दरम्यान, हा सामनादेखील होबार्टने जिंकला. २०२ धावांचा पाठलाग करताना होबार्टने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
ब्रिस्बेन हीट- उस्मान ख्वाजा (कर्णधार), नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, मॅट रेनशॉ, मॅक्स ब्रायंट, टॉम अलॉस्प (विकेटकीपर), मायकेल नेसर, झेवियर बार्टलेट, मिचेल स्वीपसन, स्पेन्सर जॉन्सन, मॅथ्यू कुहनेमन.
होबार्ट हरिकेन्स- मिचेल ओवेन, कॅलेब ज्युवेल, चार्ली वाकिम, निखिल चौधरी, जेक डोरन, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेव्हिड, नॅथन एलिस (कर्णधार), पीटर हॅटझोग्लौ, रिले मेरेडिथ, मार्कस बीन
संबंधित बातम्या