भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून (१९ सप्टेंबर) प्रारंभ झाला आहे. पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
टीम इंडिया पहिल्या कसोटीत तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह खेळणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.
भारत-बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण १३ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने ११ कसोटी जिंकल्या आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ हा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच बांगलादेशचा पराभवाचा सिलसिला तोडण्याकडे लक्ष असेल. भारताने कसोटीत ५ वेळा बांगलादेशचा डावाच्या फरकाने पराभव केला आहे.
टीम इंडिया दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात उतरली आहे. भारतीय संघाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ७ ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये खेळला होता. तब्बल एक महिन्यानंतर टीम इंडिया मैदानात आहे. त्याचबरोबर हा संघ तब्बल ६ महिन्यांनी कसोटी सामना खेळत आहे. भारताने मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.
नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या देखरेखीखाली टीम इंडियाची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. अशा परिस्थितीत, संघ या फॉरमॅटमध्ये कोणत्या दृष्टिकोनाने प्रवेश करतो हे पाहणे मनोरंजक असेल.