Mushfiqur rahim Broken Helmet Celebration : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेतील तीनही सामने रोमहर्षक झाले. शेवटी बांगलादेशने ही मालिका २-१ अशी जिंकली. याआधी दोन्ही संघांमध्ये ३ टी-20 सामन्यांची मालिकाही खेळवण्यात आली होती. श्रीलंकेने ही मालिका जिंकली होती.
विशेष म्हणजे, या दोन्ही मालिकेत अनेकदा बांगलादेश आणि श्रीलंकेचे खेळाडू आमनेसामने आले. दोन्ही संघातील खेळाडूंच्या वादामुळेदेखील ही मालिका चांगलीच गाजली.
वास्तविक, श्रीलंकेने टी-20 मालिका जिंकल्यानंतर एक खास सेलिब्रेश केले होते. ट्रॉफी हातात आल्यानंतर फोटोसेशन दरम्यान, श्रीलंकन खेळाडूंनी टाईम आऊटचा इशारा करत बांगलादेशी खेळाडूंना डिवचले होते.
पण आता वनडे मालिका जिंकल्यानंतर बांगलादेशी खेळाडूंनी बदला घेतला आहे. त्यांनी विशेष अंदाजात सेलिब्रेशन करत श्रीलंकन खेळाडूंची खिल्ली उडवली आहे.
श्रीलंका आणि बांगलादेशी खेळाडूंमधील वाद खूप जुना आहे. २०१९ पासून दोन्ही संघाचे खेळाडू सामन्यादरम्यान सतत भांडत असतात. २०१९ च्या निदहास ट्रॉफीत बांगलादेशी खेळाडूंचा नागिन डान्स लोकप्रिय झाला होता.
त्यानंतर २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये बांगलादेश आणि श्रीलंकन खेळाडूंमध्ये राडा झाला. बांगलादेशी खेळाडूंनी श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू अंजेलो मॅथ्यूजला टाइम आऊट नियमाद्वारे बाद केले होते.
अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला, तेव्हा त्याचे हेल्मेट तुटलेले होते. त्यामुळे त्याला पहिला चेंडू खेळायला थोडा उशीर झाला. पण बांगलादेशी खेळाडूंनी टाइम आऊटचे अपील केले आणि मॅथ्यूजला बाद होऊन तंबूत जावे लागले.
पण यानंतर हा प्रकार खेळ भावनांच्या विरोधात असल्याचे बोलले गेले. पण श्रीलंकेचे खेळाडू वनडे वर्ल्डकपमधील तो प्रकार विसरले नाहीत. त्यांनी टी-20 मालिका विजयानंतर हातातील घड्याळावर बोट ठेवत टाइम आउटचा इशारा करत सेलिब्रेशन केले.
आता वनडे मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफीसह फोटो सेशन करताना बांगलादेशी खेळाडूंनी श्रीलंकन खेळूडंना डिवचले आहे.
त्यांचा वरिष्ठ खेळाडू मुशफिकूर रहीम हा फोटो सेशन दरम्यान तुटके हेल्मेट घेऊन आला आणि त्याने मॅथ्यूजप्रमाणे आपले हेल्मेट तुटले आहे. थोडा वेळ द्या, अशी विनंती करण्याची अॅक्टिंग केली. यावर बांगलादेशी खेळाडूंनी नकारार्थी मान हलवली.यानंतर मुशफिकूर रहीमने निराश होत तंबूत जाण्याचा अभिनय केला. अशा प्रकारे बांगलादेशी खेळाडूंनी श्रीलंकन खेळाडूंची खिल्ली उडवली.
या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकला होता. यानंतर दुसरा वनडे श्रीलंकेच्या नावावर राहिला. अशा परिस्थितीत मालिकेतील शेवटचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २३५ धावा केल्या. झेनिथ लियानागेशिवाय श्रीलंकेचा कोणताही खेळाडू मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. जेनिथ लियानागेने नाबाद १०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने २३६ धावांचे लक्ष्य ६ गडी गमावून पूर्ण केले. बांगलादेशकडून तनजीद हसनने सर्वाधिक ८४ धावा केल्या.