रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. आज (२ सप्टेंबर) सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने कसोटीवर मजबूत पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानने बांगलादेशसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले.
चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने एकही विकेट न गमावता ४२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानातील रावळपिंडी येथे हा सामना खेळला जात असून पाहुण्या संघाला विजयासाठी अद्याप १४३ धावांची गरज आहे.
वास्तविक, बांगलादेशचे सलामीवीर लक्ष्याचा पाठलाग अतिशय वेगाने करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चौथ्या दिवशी चहापानानंतर पाऊस पडला, त्यामुळे पाकिस्तानचा संघ चौथ्या दिवशी पराभवापासून वाचला.
चौथ्या दिवशी चहापानाच्या ब्रेकपर्यंत बांगलादेश संघाने ६ षटकांत ३७ धावा केल्या होत्या. दोन्ही संघ पुन्हा मैदानात आले तेव्हा एकच षटकाचा खेळ झाला. डावाचे सातवे षटक सुरू झाल्यावर आकाशात काळे आणि दाट ढग जमा झाले, त्यामुळे मैदानावरील दोन्ही पंचांनी एकमेकांशी चर्चा करून दिवसाचा खेळ तिथेच थांबवला. त्यानंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला आणि मैदान पूर्णपणे झाकण्यात आले.
चौथ्या दिवशीच्या अखेरीस बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसन २३ धावा करून क्रीजवर आहे आणि शादमान इस्लामने ९ धावा केल्या आहेत. बांगलादेशला पाचव्या दिवशी ९० षटकात १४३ धावा करायच्या आहेत आणि सर्व १० विकेट शिल्लक आहेत. अशा बिकट परिस्थितीत एखादा चमत्कारच पाकिस्तानला पराभवापासून वाचवू शकतो.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने २ गडी गमावून ९ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी यजमान संघ १७२ धावांवर सर्वबाद झाला.
बांगलादेशने या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव केला होता. बांगलादेशने पाकिस्तान संघाविरुद्ध कसोटी सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश १-० ने आघाडीवर आहे. खराब हवामानामुळे उद्या पाचव्या दिवशी खेळ झाला नाही तरी बांगलादेशकडे मालिका १-० ने जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.
दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सॅम अयुब, शान मसूद आणि सलमान आगा यांनी अर्धशतके झळकावली. पाकिस्तान पहिल्या डावात २७४ धावांवर सर्वबाद झाला.
पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद २७४ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशने २६२ धावा केल्या. या डावात बांगलादेशकडून विकेटकीपर फलंदाज लिटन दासने शतक केले. लिटन दासने २२८ चेंडूत १३८ धावांची खेळी केली. तर मेहदी हसन मिराज याने ७८ धावा केल्या.
विशेष म्हणजे, या डावात बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली होती. त्यांचे ६ फलंदाज अवघ्या २६ धावांत तंबूत परतले होते. मात्र, यानंतर विकेटकीपर फलंदाज लिटन दास आणि मेंहदी हसन मिराज यांनी सावध खेळी करत संघाला सावरले. दोन्ही खेळाडूंमध्ये १६५ धावांची भागीदारी झाली.