बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेले आंदोलन शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून शेख हसीना यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला. देशातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. अशातच आता आंदोलकांनी बांगलादेशचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशरफी मुर्तझा याचे घरी पेटवून दिले आहे.
वास्तविक, बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू मशरफी मुर्तझा हा शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगचा खासदार म्हणून निवडून आला होता. आता या निदर्शनांदरम्यान मुर्तजाच्या घराला आग लावल्याची बातमी आली आहे. घराला आग लावण्याआधी घराची तोडफोड करण्यात आली असून लूटमार झाल्याची घटनाही समोर आली आहे.
मशरफी मुर्तझा हे बांगलादेशातील नराइल-२ मतदारसंघाचे खासदार आहेत. तसेच, मर्तुझा हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळचे मानले जातात. मुर्तझा या वर्षी सलग दुसऱ्यांदा नरेल-२ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मशरफी मुर्तझा यांच्या घराला आग लावण्याबरोबरच हिंसक आंदोलकांनी जिल्ह्यात असलेल्या अवामी लीगच्या कार्यालयालाही आग लावली.
याच जिल्ह्यातील पक्षाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली आहे. नारायणगंज-४ मतदारसंघात लूटमार आणि अवामी पक्षाशी संबंधित अनेक नेत्यांच्या घरांची तोडफोड झाल्याची बातमी आहे.
दुसरीकडे शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या अधिकृत निवासस्थानाची लूट आणि तोडफोड करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य एवढे आहे की हसीनाचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा पाडण्यात आला आहे
मशरफी मोर्तझा बांगलादेशकडून २० वर्षे क्रिकेट खेळला आणि बराच काळ कर्णधारही होता. आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीत त्याने ३६ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याच्या नावावर ७८ विकेट आणि ७९७ धावा आहेत. त्याच्या नावावर २२० एकदिवसीय सामन्यांमध्ये २७० विकेट आहेत आणि फलंदाज म्हणून त्याने १,७८७ धावा केल्या आहेत. तसेच, त्याच्या ५४ सामन्यांच्या T20 कारकिर्दीत त्याने ४२ विकेट आणि ३७७धावा केल्या.