बांगलादेश क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हतुरुसिंघे यांना शिस्तभंगामुळे निलंबित करण्यात आले आहे. आधी त्यांना ४८ तासांसाठी निलंबित करण्यात आले होते. पण आता त्यांना तत्काळ प्रभावाने बडतर्फ करण्यात आले. अशा परिस्थितीत फिल सिमन्स २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत बांगलादेश संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील.
अलीकडच्या काळात बांगलादेशच्या संघाने हथुरुसिंघे यांच्या नेतृत्वाखाली चांगले क्रिकेट खेळले आहे, परंतु मुख्य प्रशिक्षकाच्या हकालपट्टीमागे त्याचे वर्तन कारणीभूत आहे.
वास्तविक, २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकादरम्यान नसुम अहमद याला थप्पड मारल्याबद्दल ते वादात सापडले होते. बीसीबीचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नसुम अहमद याला थप्पड मारणे हे देखील हथुरुसिंघे यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याचे एक प्रमुख कारण आहे.
प्रशिक्षकपद भूषवताना त्यांनी कोणाचीही परवानगी न घेता रजेवर जाण्याचा निर्णयही घेतला होता.
चंडिका हथुरुसिंघे यांना २०१४-२०१७ दरम्यान पहिल्यांदा बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते, परंतु त्यावेळी त्यांनी करार संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हथुरुसिंघेच्या या कारवाईनंतरही बीसीबीने त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली नाही. असे असूनही, जानेवारी २०२३ मध्ये त्यांना पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली.
त्यांचा करार पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये संपणार होता, पण वाईट वागणुकीमुळे त्यांना नोकरी गमवावी लागली आहे. बांगलादेशने २०१४-२०१७ दरम्यान श्रीलंकन प्रशिक्षक हथुरुसिंघे यांच्या नेतृत्वाखाली चांगला खेळ केला होता. त्यादरम्यान भारत, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यातही संघाला यश आले होते.
संबंधित बातम्या