बांगलादेशच्या क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत ३-० असा धुव्वा उडवला. मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा ८० धावांनी पराभव झाला. वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य होते, मात्र कॅरेबियन संघ १६.५ षटकांत १०९ धावांवरच गारद झाला. हा सामना सेंट व्हिन्सेंट येथील अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंगस्टोन येथे खेळला गेला.
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने २० षटकांत ७ बाद १८९ धावा केल्या.
बांगलादेशच्या १८९ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. विंडीजचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनच्या जवळ येत राहिले. सलामीवीर ब्रँडन किंग खाते न उघडताच बाद झाला. तर जॉन्सन चार्ल्सने १८ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले.
वेस्ट इंडिजसाठी रोमारिया शेफर्डने २७ चेंडूत सर्वाधिक ३३ धावा केल्या. या खेळीत त्याने १ चौकार आणि ३ षटकार मारले. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरनने १० चेंडूत १५ धावा केल्या. रोस्टन चेस, रोव्हमन पॉवेल आणि जस्टिन ग्रेव्हजसारख्या फलंदाजांनी निराशा केली.
बांगलादेशकडून रिशाद हुसेन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हुसेनने वेस्ट इंडिजच्या ३ फलंदाजांना आपले बळी बनवले. याशिवाय तस्किन अहमद आणि मेहंदी हसन मिराजने २-२ बळी घेतले. तर तंजीम हसन साकिब आणि हसन महमूद यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
यापूर्वी बांगलादेशकडून झाकेर अलीने तुफानी खेळी केली. झाकेर अलीने ४१ चेंडूत ७२ धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार मारले. परवेझ हुसेन इमॉनने २१ चेंडूत ३९ धावा केल्या. तर मेहंदी हसन मिराजने २३ चेंडूत २९ धावांचे योगदान दिले.
वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक २ बळी घेतले. याशिवाय अल्झारी जोसेफ, रोस्टन चेस आणि गुडाकेश मोटे यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.
संबंधित बातम्या