ऑस्ट्रेलियात सध्या बीग बॅश लीगचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात एक दुखद घटना घडली. यामध्ये मैदानावर बसलेल्या एका पक्ष्याला चेंडू लागल्याने त्याचे पंख तुटले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या BBL च्या २८ व्या सामन्यात ही घटना घडली.
या सामन्यात सिडनी सिक्सर्सचा फलंदाज जेम्स विन्सने एक जोरदार शॉट खेळला, यामुळे मैदानात बसलेला पक्षी गंभीर जखमी झाला.
सिडनी सिक्सर्स संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा दुसऱ्या डावात ही घटना घडली. संघाकडून सलामीला आलेल्या जेम्स विन्सने शानदार खेळी केली. दरम्यान, त्याने मारलेल्या एका शॉटमुळे सीगल पक्षी जखमी झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता की, गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर विन्स स्ट्रेटच्या दिशेने हवेत शॉट खेळतो. यानंतर चेंडू थेट सीमारेषेच्या आत बसलेल्या सीगल पक्ष्यावर जाऊन आदळतो. यामुळे पक्षी गंभीर जखमी झाला. विन्सचा चेंडू लागल्यानंतर पक्षी उडू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार पक्ष्याचा मृत्यू झाला होता.
जेम्स विन्सने शानदार खेळी खेळली आणि ४४ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. मात्र, त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
तत्पूर्वी, या सामन्यात सिडनी सिक्सर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मेलबर्न स्टार्सने २० षटकांत ५ बाद १५६ धावा केल्या. यादरम्यान ग्लेन मॅक्सवेलने संघासाठी शानदार खेळी खेळली आणि ३२ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. याशिवाय वेबस्टरने ४१ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४८ धावा केल्या.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सिडनी सिक्सर्सला २० षटकांत केवळ ९ बाद १४० धावाच करता आल्या आणि संघाने १६ धावांनी सामना गमावला. यादरम्यान जेम्स विन्सने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ५३ धावा केल्या. तर मेलबर्न स्टार्ससाठी मार्क स्टीकेटीने सर्वाधिक ३ बळी घेतले.
संबंधित बातम्या