पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज बाबर आझम याने दुसऱ्यांदा कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबर पाकिस्तानचा एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार होता. याआधीही बाबरने एकदा राजीनामा दिला होता, मात्र त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले होते.
यावेळी बाबरने 'वर्कलोड'चे कारण देत पाकिस्तानचे कर्णधारपद सोडले. याशिवाय तो म्हणाला, की आता तो आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकेल.
बाबरने बुधवारी ( २ ऑक्टोबर) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली. बाबरने सोशल मीडियावर लिहिले की, "प्रिय चाहत्यांनो, मी आज तुमच्यासोबत काही बातम्या शेअर करत आहे. मी पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची माहिती पीसीबी आणि संघ व्यवस्थापनाला गेल्या महिन्यात देण्यात आली होती. "
बाबरने लिहिले, "या संघाचे कर्णधारपद मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे, पण आता या पदावरून पायउतार होण्याची आणि माझ्या खेळण्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. कर्णधारपद हा एक लाभदायक अनुभव आहे, परंतु त्यामुळे कामाचा ताण वाढतो.
मला माझ्या कामगिरीला प्राधान्य द्यायचे आहे, माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, ज्यामुळे मला आनंद मिळतो.”
बाबरने पुढे लिहिले, "पदावरून पायउतार झाल्यामुळे, मी पुढे जाण्यासाठी स्पष्टता प्राप्त करू शकेन आणि माझ्या खेळावर आणि वैयक्तिक विकासावर अधिक ऊर्जा केंद्रित करू शकेन."
बाबर आझमचा एका वर्षात कर्णधारपदाचा हा दुसरा राजीनामा आहे. यापूर्वी त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर बाबरने १५ नोव्हेंबर २०२३ रोजी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बाबर पाकिस्तानचा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार होता.