Babar Azam Stats & Records : आशिया कप 2023 च्या पहिल्या सामन्यात नेपाळसमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ६ गडी गमावून ३४२ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने १३१ चेंडूत १५१ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत १४ चौकार आणि ४ षटकार मारले. याशिवाय इफ्तिखार अहमदने अवघ्या ७१ चेंडूत १०९ धावा केल्या.
विशेष म्हणजे, या शतकानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबर आझमने नेपाळविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील १९वे शतक झळकावले. बाबर आझमने १०२ डावात १९व्यांदा शतकाचा टप्पा पार केला. अशाप्रकारे बाबर आझम सर्वात कमी डावात १९ शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
त्याचबरोबर या यादीत दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला आहे. हाशिम आमलाने १०४ डावात १९ शतके ठोकली होती.
सर्वात जलद १९ शतके करण्याच्या यादीत भारताचा दिग्गज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने १२४ डावांमध्ये १९ शतकांचा आकडा गाठला होता. त्याचबरोबर विराट कोहलीनंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा क्रमांक आहे. डेव्हिड वॉर्नरने १३९ डावात १९ शतके ठोकली होती.
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सने १७१ डावात १९ शतके ठोकली. अशा प्रकारे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशाप्रकारे बाबर आझमने हाशिम आमला, विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.