कॅरिबियन प्रीमियर लीगच्या (CPL 2024) १२व्या हंगामातील दुसरा सामना अँटिग्वा अँड बारबुडा फाल्कन्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गयानाच्या संघाने ३ विकेट्सने बाजी मारली.
पण या सामन्यात गयानाकडून खेळणारा पाकिस्तानी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आझम खान विचित्र पद्धतीने बाद झाला. आझम ९ चेंडूत ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
एका बाउन्सर बॉलवर आझम खानने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. तोल जाऊन तो खाली कोसळला आणि चेंडू त्याला लागून स्टपंवर आदळला.
अँटिग्वा आणि बार्बुडा फाल्कन्स संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज शामर स्प्रिंगर हा डावाचे १२वे षटक टाकत होता. त्याने षटकातील तिसरा चेंडू बाउन्सर टाकला. स्ट्राइकवर असलेला आझम खान पूर्णपणे चकित झाला. त्याला चेंडू कळलाच नाही.
आझमने हा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या डोक्यावरून गेला. त्यावेळी आझम स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो गुडघ्यावर कोसळला आणि चेंडू थेट स्टंपवर लागला . आझमला चेंडू मानेला लागल्यानंतर त्याने लगेच हेल्मेट काढून त्याची मान पकडली. त्याला खूप वेदना होत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं.
गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने हा सामना अतिशय रोमांचक पद्धतीने ३ विकेट्सने जिंकला. १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गयाना संघाने १९ षटकांत ७ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. यानंतर अखेरच्या षटकात त्यांना विजयासाठी १६ धावांची गरज होती.
मोहम्मद अमीरच्या या षटकात ड्वेन प्रिटोरियसने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत गयाना संघाला ३ विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ४ धावांची गरज होती.