असे म्हणतात की वयाचा तुमच्या प्रतिभेशी काहीही संबंध नसतो. तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्ही लहान वयातच तुमची सर्वोत्तम कामगिरी करू शकता. अशाच प्रकारे मुंबईच्या १७ वर्षीय खेळाडूने एक पराक्रम केला आहे.
मुंबई क्रिकेट संघाचा १७ वर्षीय खेळाडू आयुष म्हात्रे याने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या गट टप्प्यातील सामन्यात त्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नागालँडविरुद्ध शतक झळकावले आहे. त्याच हे लिस्ट-ए कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे.
वास्तविक, २०२४ च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज ३१ डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर मुंबई आणि नागालँड यांच्यात विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नागालँड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाच्या डावाची सुरुवात आयुष म्हात्रे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी केली. या दोघांनी मुंबई संघाला दमदार सुरुवात करून दिली आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी झाली. अंगक्रिश बाद झाला, पण म्हात्रेने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली.
आयुषने ११७ चेंडूंचा सामना करत १८१ धावा केल्या. १७ वर्षीय आयुषने लिस्ट-ए क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. मात्र, दुहेरी शतक पूर्ण करण्यात तो अवघ्या १९ धावांनी पडला. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट १५४ पेक्षा जास्त होता आणि त्याच्या खेळीत एकूण ११ षटकार आणि १५ चौकारांचा समावेश होता.
आयुषशिवाय आंगक्रिशने ५६ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कर्णधार शार्दुल ठाकूरने २८ चेंडूत ७३ धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे मुंबई संघाने ५० षटकांत ७ गडी गमावून ४०३ धावा केल्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मुंबई संघाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती.
आयुष म्हात्रे यांचा जन्म २००७ मध्ये झाला. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. २०२४ च्या इराणी चषकादरम्यान म्हात्रेने मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचवेळी त्याने रणजी ट्रॉफीतील पहिले प्रथम श्रेणीतील शतक झळकावले. १७ वर्षांच्या आयुषने अल्पावधीतच अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आत्तापर्यंत त्याने फर्स्ट क्लासमध्ये ६ सामने खेळले आहेत आणि या दरम्यान त्याने आपल्या बॅटने ४४१ धावा केल्या आहेत, तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये ३०९ धावा केल्या आहेत.