दुलीप ट्रॉफी २०२४ चा थरार आजपासून (५ सप्टेंबर) सुरू झाला आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची निवड होणार आहे, यासाठी दुलीप ट्रॉफीतील पहिला सामना सर्वच खेळाडूंसाठी महत्वाचा आहे.
दरम्यान, दुलीप ट्रॉफीचा दुसरा सामना टीम सी आणि टीम डी यांच्यात अनंतपूर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात अक्षर पटेलने दमदार फलंदाजी केली. त्याचे शतक हुकले, पण ही इनिंग त्याच्या आणि चाहत्यांच्या कायम लक्षात राहणारी आहे. कारण संघाने अवघ्या ७८ धावात ८ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अक्षर पटेलने संघाला १६४ धावांपर्यंत पोहोचवले.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इंडिया डीकडून खेळणाऱ्या अक्षर पटेलने आपले अर्धशतक अतिशय खास पद्धतीने पूर्ण केले, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयद्वारे शेअर करण्यात आला आहे.
अक्षरने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने ११८ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या. यादरम्यान अक्षरने ३ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. अक्षर ७४ चेंडूत ३७ धावांवर असताना त्याने अक्षरने मानव सुतारच्या गोलंदाजीवर २ षटकार आणि १ चौकार ठोकला आणि अर्धशतक पूर्ण केले.
अक्षर पटेलने टीम डी संघासाठी शानदार खेळी खेळली, तर संघाचे इतर सर्व फलंदाज मात्र सपशेल फ्लॉप होताना दिसले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत डी संघ केवळ १६४ धावांवर आटोपला, ज्यामध्ये अक्षर पटेलने ८६ धावांचे योगदान दिले.
अक्षरानंतर संघासाठी सर्वात मोठी खेळी सरांश जैन आणि श्रीकर भरत यांची होती. दोन्ही फलंदाजांनी १३-१३धावा केल्या. संघाचे एकूण ६ फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत, त्यापैकी ३ फलंदाजांनी आपले खातेही उघडले नाही.
यादरम्यान भारत क संघाकडून विजयकुमार वैश्यने सर्वाधिक ३ बळी घेतले. बाकी अंशुल कंबोज आणि हिमांशू चौहान यांनी २-२ बळी घेतले. याशिवाय मानव सुथार आणि हृतिक शौकीन यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
दरम्यान, पहिला सामना संपल्यानंतरच निवड समितीची बैठक होईल, ज्यामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. दुलीप ट्रॉफीचे सामने फक्त ४ दिवस चालतात, त्यामुळे हा सामना पूर्ण वेळ खेळला गेल्यास हा सामना ८ सप्टेंबरला संपेल.
भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. अशा स्थितीत पुढील आठवड्यात टीम इंडियाची निवड होणार हे निश्चित आहे. निवडकर्त्यांच्या नजरा दुलीप ट्रॉफीवर आहेत, जे खेळाडू येथे चांगली कामगिरी दाखवतील त्यांची संघात निवड होऊ शकते, तर फ्लॉप झालेल्या खेळाडूंचे पत्ते कट केले जाऊ शकतात.