आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने एकूण ४ खेळाडूंना रिेटेन केले होते. अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल आणि कुलदीप यादव अशी या ४ खेळाडूंची नावे आहेत. आता लिलावाची तारीख जवळ येत आहे आणि ऋषभ पंतला रीलीज केल्यानंतर दिल्ली फ्रँचायझी कोणत्या खेळाडूला कर्णधार बनवू शकते हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
अशातच, आता एक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये अक्षर पटेल याला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी हंगामात अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारू शकतो. आयपीएल २०२४ मध्ये, जेव्हा ऋषभ पंतला स्लो ओव्हर-रेटमुळे RCB विरुद्धच्या सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते, तेव्हा अक्षर पटेल यानेच पंतच्या जागी दिल्लीचे नेतृत्व केले होते.
आगामी हंगामासाठी अक्षर पटेलला १६.५ कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीने कायम ठेवलेला तो सर्वात महागडा खेळाडू आहे. हे देखील एक संकेत आहे की दिल्ली फ्रँचायझी अक्षरवर विश्वास ठेवण्यास तयार आहे.
अक्षर पटेल २०१९ पासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. त्याने DC फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करताना एकूण ८२ सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर ९६७धावा आणि ६२ विकेट्स आहेत. दिल्लीकडून खेळताना त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक यश मिळवले आहे. यापूर्वी त्याने पंजाब किंग्जकडून ६८ सामन्यात ६८६ धावा करण्यासोबतच ६१ विकेट्सही घेतल्या होत्या.
अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद मिळाल्यास तो आयपीएलमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व करणारा भारताचा पहिला अष्टपैलू खेळाडू ठरेल. जेम्स होप्स आणि जेपी ड्युमिनी हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांनी दिल्लीचे कर्णधारपद भूषवले आहे परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीय अष्टपैलू खेळाडूने असे केले नाही.
वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीरसारखे फलंदाज आणि झहीर खानसारख्या दिग्गज गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळलली आहे. मात्र अक्षर हा अष्टपैलू खेळाडू असल्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून इतिहास घडवू शकतो.