India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्राफी खेळली जाणार आहे. या मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर नॅशन मॅकस्वीनीने भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
शेफिल्ड शिल्ड स्पर्धा आणि नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या 'अ' मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर मॅकस्वीनीला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाचा २५ वर्षीय मॅकस्वीनी उस्मान ख्वाजासोबत २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीत डावाची सुरुवात करेल.
मॅकस्वीनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'बुमराहची अॅक्शन अनोखी आहे. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या अॅक्शनची नक्कल करणे अवघड आहे. मी त्याला सामोरे जाण्यास उत्सुक आहे. भारत ‘अ’ संघावर २-० असा विजय मिळवून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे नेतृत्व करणारा मॅकस्वीनी म्हणाला की, बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीचे व्हिडिओ पाहून तो मानसिक तयारी करीत आहे.
मॅकस्वीनी म्हणाला की, ‘मी त्यांच्या गोलंदाजीच्या क्लिप पाहिल्या आहेत आणि त्याला सामोरे जाण्यासाठी मी स्वतःला मानसिकरित्या तयार करत आहे. नवीन गोलंदाजाला सामोरे जाणे थोडे आव्हानात्मक असते आणि केवळ अॅक्शन पाहून आपण त्याची तयारी करू शकत नाही. मी गेल्या महिनाभरापासून चांगली फलंदाजी करत असून माझी तयारी निश्चित आहे. आशा आहे की, मी ही गती कायम ठेवू शकेन. खूप काही शिकण्यासारखे आहे आणि कसोटी क्रिकेटच्या आव्हानांबद्दल जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.’
मॅकस्वीनीच्या निवडीचे डेव्हिड वॉर्नर आणि रिकी पाँटिंग यांनी समर्थन केले. मार्कस हॅरिस, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट आणि सॅम कॉन्स्टस यांच्यापेक्षा त्याला प्राधान्य देण्यात आले. ऑस्ट्रेलियन निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी नुकतेच सांगितले की, ‘नॅथनच्या खेळाबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. गेल्या दीड वर्षात तो आपल्या खेळात खूप परिपक्व झाला आहे. कसोटी क्रिकेट त्याला शोभेल कारण तो अतिशय स्थिर भावनेने खेळतो.’
- पहिला कसोटी सामना: २२ ते २६ नोव्हेंबर (पर्थ स्टेडियम, पर्थ)
- दुसरा कसोटी सामना: ०६ डिसेंबर ते १० डिसेंबर (ॲडलेड ओव्हल, ॲडलेड)
- तिसरा कसोटी सामना: १४ ते १८ नोव्हेंबर (द गाबा, ब्रिस्बेन)
- चौथा कसोटी सामना:२६ ते ३० नोव्हेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न)
- पाचवा कसोटी सामना: ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी)