ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अजब कारनामा केला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम मोडला.
ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडविरूद्ध पॉवरप्लेमध्ये म्हणजेच, पहिल्या ६ षटकात १ बाद ११३ धावांचा पाऊस पाडला.
कांगारू संघाच्या वतीने ट्रॅव्हिस हेडचे झंझावाती अर्धशतक आणि मिचेल मार्शच्या वादळी खेळीने हा विशेष टप्पा गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्कॉटलंडने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने केवळ ९.४ षटकांत पूर्ण केले आणि सामना ७ गडी राखून जिंकला.
ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. उभय संघांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका आहे, ज्यातील पहिल्या T20 सामन्यात कांगारू संघाने दणदणीत विजय नोंदवला.
पहिल्याच सामन्यात, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी स्कॉटलंडच्या गोलंदाजांना खूप त्रास दिला आणि बुधवारी एडिनबर्गमधील ग्रेंज क्रिकेट क्लबमध्ये स्कॉटलंड विरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने जबरदस्त फटकेबाजी केली.
कांगारू संघाने पॉवरप्लेमध्ये ११३ धावा करून नवा विक्रम प्रस्थापित केला. T20I क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा विश्वविक्रम मोडला, जो त्यांनी २०२३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध पॉवरप्लेमध्ये १०२ धावा करून केला होता, पण ट्रॅव्हिस-मिशेलच्या झंझावाती खेळीने तो मोडला.
१) ऑस्ट्रेलिया ११३/१ विरुद्ध स्कॉटलंड, २०२४
२) दक्षिण आफ्रिका १०२/० विरुद्ध वेस्ट इंडिज, २०२३
३) वेस्ट इंडिज ९८/४ विरुद्ध श्रीलंका, २०२१
४) वेस्ट इंडिज ९३/० विरुद्ध आयर्लंड, २०२०
५) वेस्ट इंडिज ९२/१ विरुद्ध अफगाणिस्तान, २०२४
या सामन्यात स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावा केल्या हो्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडच्या स्फोटक खेळीने सर्वांनाच चकित केले. त्याने अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
ट्रॅव्हिस हेड एवढ्यावरच थांबला नाही. त्याने स्कॉटलंडच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. त्याने अवघ्या २५ चेंडूत ८० धावांची खेळी खेळली, ज्यात १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याच्या झंझावाती खेळीत ब्रॅड व्हीलने टाकलेल्या एकाच षटकात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.