ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी केलं शतकी खेळीचं कौतुक, विराटनं दिलं 'मसाले'दार उत्तर, video व्हायरल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी केलं शतकी खेळीचं कौतुक, विराटनं दिलं 'मसाले'दार उत्तर, video व्हायरल

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी केलं शतकी खेळीचं कौतुक, विराटनं दिलं 'मसाले'दार उत्तर, video व्हायरल

Nov 28, 2024 06:57 PM IST

Anthony Albanese praises virat kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील मिश्किल संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अँथनी अल्बानीज यांनी केलं विराट कोहलीच्या शतकाचं कौतुक
अँथनी अल्बानीज यांनी केलं विराट कोहलीच्या शतकाचं कौतुक (AP)

virat kohli meets australian pm Anthony Albanese : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात विराटनं झळकावलेल्या शतकामुळं खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही भारावून गेले. त्यांनी विराटशी भेटीत त्याचं कौतुक केलं. त्यावर विराटनं आपल्या नेहमीच्या स्टाइलनं त्यांना मिश्किल चिमटा काढला. दोघांमधील मजेशीर संवादाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यातील पहिला सामना पर्थमध्ये खेळला गेला. दुसरा सामना ६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी, भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू परदेश दौऱ्यावर असताना ते अनेकदा तिथले भारतीय उच्चायुक्त किंवा स्थानिक सरकारच्या प्रतिनिधींना भेटत असतात. यावेळी भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान अल्बानीज यांची भेट घेतली. या भेटीत काही नवीन नसले तरी यावेळी विराट आणि पंतप्रधान अल्बानीज यांच्यात झालेला संवाद चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियात या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात पंतप्रधान अँथनी अल्बनीज भारतीय खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पंतप्रधान अल्बानीज यांना सहकाऱ्यांची ओळख करून देत आहे. अल्बानीज हे सुरुवातील भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचं कौतुक करतात. त्यांच्याशी हस्तांदोलन करून ते पुढं जातात तेव्हा विराटला पाहून हात खूष होतात. त्याची विचारपूस करतात.

‘पर्थमध्ये तू शानदार शतक झळकावलंस. आम्हाला (ऑस्ट्रेलियन संघाला) त्यावेळी काही कष्टच करावे लागत नव्हतं असं वाटत होतं. हे खरंच विलक्षण होतं, असं अल्बानीज म्हणाले. त्यावर, 'सामन्यात थोडा मीठ-मसाला हवाच ना, असं विराट मिश्किलपणे म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर एक हशा पिकला.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८१ वं शतक

विराट कोहलीनं पर्थमध्ये कसोटी कारकिर्दीतील ३० वं शतक झळकावलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपलं ८१ वं शतक झळकावलं. त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याच्या शतकांची संख्या १०० झाली आहे. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये हे स्थान मिळवणारा तो दुसरा फलंदाज आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त शतकं झळकावणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे.

Whats_app_banner