AUS vs NZ, World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकपचा २७वा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात (२८ ऑक्टोबर) खेळला गेला. धर्मशालाच्या मैदानावरील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, या स्टेडियममधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक ऑस्ट्रेलियन फॅन ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसत आहे.
घोषणाबाजी करणारी व्यक्ती ऑस्ट्रेलियन क्रिकेट फॅन आहे. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा व्यक्ती भारतीय प्रेक्षकांमध्ये उभा होता आणि मोठमोठ्याने जय श्री रामच्या घोषणा देत होता. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेले इतर क्रिकेट चाहतेही त्याला साथ देताना दिसले. यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणाही दिल्या.
ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी अशा घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यानही ऑस्ट्रेलियन चाहते भारत माता की जयच्या घोषणा देत होते. ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या या व्हिडिओंमधून कांगारू संघाला भारतीय चाहत्यांचाही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. स्टेडियममध्ये उपस्थित असलेले अनेक भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला सपोर्ट करताना दिसत आहेत.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या थरारात न्यूझीलंडच्या जेम्स नीशमने ऑस्ट्रेलियाकडून सामना जवळपास हिसकावून घेतला होता, पण दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला आणि इथून सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.२ षटकात सर्वबाद ३८८ धावा केल्या होत्या, या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ३८३ धावांपर्यंत मजल मारली, विजयासाठी त्यांना ५ धावा कमी पडल्या.
संबंधित बातम्या