टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये बुधवारी (१२ जून) ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा पराभव केला आहे. कांगारूंनी नामिबियाचा ८६ चेंडूत ९ विकेट राखून पराभव केला. प्रथम फलंदाजीला आलेला नामिबियाचा संघ १७ षटकांत अवघ्या ७२ धावांत गारद झाला. याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने अवघ्या ५.४ षटकांत १ गडी गमावून लक्ष्य गाठले.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ८ चेंडूत २० धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेड १७ चेंडूत ३४ धावा करून नाबाद परतला. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने ९ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सहज विजयाची नोंद केली.
वास्तविक, ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२४ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. या फलंदाजाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला जवळपास प्रत्येक सामन्यात झंझावाती सुरुवात केली होती. त्याचबरोबर आता ट्रॅव्हिस हेडच्या बॅटने वर्ल्ड कपमध्ये आग लावली आहे. यापूर्वी आयपीएल २०२४ मध्ये ट्रॅव्हिस हेडने १३ सामन्यांत १९९.६३ च्या स्ट्राइक रेटने ५३३ धावा केल्या होत्या.
फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र ट्रॅव्हिस हेडने आपल्या तुफानी फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. मात्र, आता टी-20 वर्ल्ड कपमध्येही ट्रॅव्हिस हेडने आपला फॉर्म काय असल्याचे दाखवून दिले आहे.
त्याचवेळी नामिबियाविरुद्धच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने सुपर-८ फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचे ३ सामन्यांत ६ गुण झाले आहेत. ब गटात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. याआधी नुकतेच ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. आता ऑस्ट्रेलियाची नजर टी-२० विश्वचषक विजेतेपदावर आहे. मात्र, याआधी ऑस्ट्रेलियाने २०२१ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता.
संबंधित बातम्या