Brad Hogg Reaction Mayank yadav Injury : भारताचा वेगवान स्टार मयंक यादव याने २०२४ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याच्या पहिल्या सीझनमध्ये त्याने ४ सामने खेळले आणि ७ विकेट घेतल्या. पण त्याला सर्वाधिक ओळख त्याच्या वेगामुळे मिळाली कारण एलएसजीकडून खेळताना त्याने ताशी १५६.७ किमी वेगाने चेंडू टाकून खळबळ उडवून दिली.
पण दुर्दैवाने, सततच्या दुखापतींमुळे त्याची कारकीर्द स्थिरपणे वाढताना दिसत नाही. आता ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॉग याने मयंकसह त्या सर्व भारतीय खेळाडूंचा खरपूस समाचार घेतला आहे, जे आयपीएल करार मिळाल्यानंतर इतर कशाचाही विचार करत नाहीत.
ब्रॅड हॉग याने त्याच्या यूट्यूब चॅनलद्वारे सांगितले, की मयंक यादव याला आयपीएल स्तरावरील फिटनेसच्या पलीकडे जायचे नाही, म्हणूनच तो आतापर्यंत भारताच्या कसोटी संघात प्रवेश करू शकला नाही.
हॉग म्हणाला, "मयंक यादवला त्याच्या वेगामुळेच ओळख मिळाली आहे. त्याच्यासारखे आणखी काही गोलंदाज आहेत, जे सातत्याने १४५-१५० च्या वेगाने गोलंदाजी करतात.
भारतातून युवा वेगवान गोलंदाज उदयास येत आहेत, काहीवेळा ते फक्त वेगवान गोलंदाजी करावी असा विचार करतात. कारण त्यांना वाटते की आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळालं तरी पुरेसं आहे.'
आयपीएलचा चांगला करार मिळाल्यानंतर भारतीय खेळाडू इतर सर्व गोष्टींना मूर्खपणा मानायला लागतात यावरही ऑस्ट्रेलियन दिग्गजाने विशेष भर दिला.
ब्रॅड हॉग म्हणाला, "आयपीएलचा करार मिळताच त्यांच्यासाठी इतर सर्व काही मूर्खपणाचे ठरते. ते लांब फॉरमॅटमध्ये कसे खेळायचे हे शिकत नाहीत. त्यासाठी सहनशीलतेने आणि संयमाने खेळण्याची गरज लागले. हे आयपीएलमधून येत नाही.'
मयंक यादवला LSG ने २०२३ साली करारबद्ध केले होते. अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याला २०२४ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याला LSG ने २० लाख रुपयांना विकत घेतले, पण IPL २०२५ साठी लखनौ सुपर जायंट्सने त्याला ११ कोटी रुपये देऊन रिटेन केले आहे.
संबंधित बातम्या