Australia Vs South Africa World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये आज (१६ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना दुपारी २ वाजेपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेच्या संघ त्यांच्यावर लागलेला चोकर्सचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न करेल. आफ्रिकेच्या प्रत्येक चाहत्याला 'चोकर्स' या शब्दाचा तिरस्कार आहे आणि मोठे सामने जिंकण्याची सवय असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पुन्हा एकदा त्यांच्या जखमांवर मीठ चोळायला आवडेल. वर्ल्डकप सामन्यांमध्ये आफ्रिकेच्या संघाने जीवाला लागणारे अनेक पराभव पचवले आहेत.
दरम्यान, कोलकाताच्या मैदानावर आफ्रिकेचा रेकॉर्ड खराब राहिला आहे. याच मैदानावर आफ्रिकेला नेदरलँड्सकडून पराभव स्विकारावा लागला होता. तसेच, याच मैदानावर भारताने आफ्रिकेला अवघ्या ८३ धावांत गारद केले होते.
मात्र, याशिवाय दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या आघाडीच्या ६ फलंदाजांपैकी ४ फलंदाजांनी शतके झळकावली आहेत. यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने आतापर्यंत ५९१ धावा केल्या आहेत.
एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघ एकूण १०९ वेळा भिडले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने ५० सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने ५५ सामने जिंकले आहेत. ३ सामने बरोबरीत तर एक सामना अनिर्णित राहिला.
त्याचबरोबर विश्वचषकात दोन्ही संघ ७ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने ३ सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेनेही ३ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत राहिला आहे.
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आणि एक सामना बरोबरीत राहिला.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी.
संबंधित बातम्या