मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  U19 WC Final: ठरलं! भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप फायनल; सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव

U19 WC Final: ठरलं! भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप फायनल; सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 09, 2024 06:51 AM IST

AUS beat PAK by 1 wicket: अंडर १९ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

PAK vs AUS
PAK vs AUS

U19 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या अंडर १९ विश्वचषकातील दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या अवघ्या १८० धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. मात्र, शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एका विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारत आणि पाकिस्तान फायनल सामन्यावर पाणी ओतले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ४८.५ षटकांत पाकिस्तानला १७९ धावांत गुंडाळला. पाकिस्तानकडून अझान आवेश आणि अराफत मिन्हास यांनी प्रत्येकी ५२-५२ धावांची खेळी केली. त्यांच्या व्यतिरिक्त सलामीवीर शामियाल हुसेनला दुहेरी आकडा गाठता आला. तो १७ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्टारकरने सहा विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४९.१ षटकात ९ विकेट गमावून १८१ धावा केल्या.

पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने १५५ धावांवर सात विकेट गमावल्या. ऑलिव्हर पीके बाद झाल्यानंतर कांगारू संघ हा सामना हरणार असे वाटत होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. टॉम स्टारकरने राफे मॅकमिलनच्या साथीने धावसंख्या १६४ धावांवर नेली. स्टारकर तीन धावा करून बाद झाला. त्यानंतर ४६ व्या षटकात अली रझाने महिल बियर्डमनला शून्यावर बोल्ड केले. मात्र, मॅकमिलन आणि कॅलम विडलर यांनी १७ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

अंडर १९ विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (११ फेब्रुवारी) होणार आहे. भारतीय संघाने याआधीच अंतिम फेरी गाठली. बेनोनी येथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा अंडर १९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला तीन वेळा विजेतेपद पटकावण्यात यश आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंतिम सामना होणार आहे. भारताने २०१२ आणि २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताच्या खात्यात एकूण पाच जेतेपदे आहेत.

WhatsApp channel

विभाग

For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi