बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा दणका बसला आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने दमदार कामगिरी केली.
पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला ३५ षटकांत १६३ धावांत गुंडाळले आणि एक विकेट गमावून हे लक्ष्य सहज गाठले. पाकिस्तानकडून गोलंदाजीत हारिस रौफने घातक गोलंदाजी करताना ५ बळी घेतले, तर फलंदाजीत सॅम अयुबने सर्वाधिक ८२ धावा केल्या.
हा पराभव ऑस्ट्रेलियाला पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. मालिकेतील पहिला सामना तीन गडी राखून गमावल्यानंतर पाकिस्तानकडून अशा पुनरागमनाची अपेक्षा क्वचितच कोणाला असेल. पण त्यांनी ते करून दाखवले.
आधी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा बँड वाजवला आणि मग सॅम अयुबने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पीसं काढली.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघ ३५ षटकांत १६३ धावांवर ऑलआऊट झाला. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ३५ धावांचे योगदान दिले, तर त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला २० धावांचा टप्पाही गाठता आला नाही.
पाकिस्तानकडून हारिस रऊफने आठ षटकांत २९ धावा देत ५ तर शाहीन आफ्रिदीने ८ षटकांत २६ धावांत ३ बळी घेतले. नसीम शाह मात्र महागडा ठरला आणि त्याने १० षटकांत ६५ धावा देत केवळ एक विकेट घेतली. यानंतर १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ कधीच अडचणीत दिसला नाही.
अब्दुल्ला शफीक आणि सॅम अयूब यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. सॅम अयुबसमोर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स पूर्णपणे कुचकामी ठरले. अयुबने ७१ चेंडूत ८२ धावा केल्या, ज्यात ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. अब्दुल्ला शफीक ६९ चेंडूत ६४ धावा करून नाबाद परतला तर बाबर आझम २० चेंडूत १५ धावा करून नाबाद परतला.
बाबरने षटकार मारत पाकिस्तानला ९ गडी राखून संस्मरणीय विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम जाम्पाने एकमेव विकेट घेतली. हारिस रऊफ ला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.