भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार ६ डिसेंबरपासून अॅडलेडयेथे खेळला जाणार आहे. या डे-नाईट कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. कर्णधार पॅट कमिन्सने संघातील बदलाला दुजोरा दिला आहे.
जोश हेझलवूडच्या जागी वेगवान गोलंदाज स्कॉट बाऊलँडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघात अन्य कोणतेही बदल केले जाणार नाहीत.
कर्णधार पॅट कमिन्सने दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत जोश हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलंड खेळणार असल्याची माहिती दिली. बोलंड याला बराच अनुभव आहे. संघ संयोजनामुळे तो जास्त कसोटी सामने खेळला नसला तरी त्याला देशांतर्गत क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. स्कॉट बोलंडने आतापर्यंत खेळलेल्या १० कसोटी सामन्यांच्या १९ डावात ३५ बळी घेतले आहेत. बोलंडने आपली शेवटची कसोटी जुलै २०२३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती.
भारताविरुद्धच्या गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात स्कॉट बोलंडने पंतप्रधान इलेव्हन संघाचे नेतृत्व केले. त्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. तो पहिल्यांदाच भारताविरुद्ध पिंक बॉल टेस्ट खेळणार आहे.
याआधी तो भारताविरुद्ध लाल चेंडूने २ कसोटी खेळला आहे, ज्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या आहेत. स्कॉट बोलंडच्या एकूण कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने ऑस्ट्रेलियासाठी १० कसोटीत ३५ बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाने गुलाबी चेंडू कसोटीसाठी हेच संयोजन ठेवले आहे, जे पर्थमध्ये पाहायला मिळाले. संघात ३ वेगवान गोलंदाज आणि १ फिरकीपटूचा समावेश आहे. कर्णधार पॅट कमिन्सने नॅथन मॅकस्विनीवर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पदार्पणाच्या कसोटीत मॅकस्वीनीला विशेष काही करता आले नाही. पण त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड
संबंधित बातम्या