Australia Needs 162 Runs to Win Sydney Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनीत खेळला जात आहे. या सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ १५७ धावांवर गारद झाला आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी आता १६२ धावांचे लक्ष्य आहे. भारताला पहिल्या डावात ४ धावांची आघाडी मिळाली होती. सिडनी कसोटी जिंकण्यासाठी भारताला कोणत्याही किंमतीत या लक्ष्याचा बचाव करावा लागेल.
पीचची स्थिती पाहता एवढ्या धावांवर टीम इंडियाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. अशा स्थितीत सिडनी कसोटीचा थरार वाढला आहे.
दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना स्कोअरबोर्डवर केवळ १६ धावा जोडता आल्या आणि या १६ धावांतच शेवटच्या ४ विकेट्स गमावल्या. भारतासाठी डावातील सर्वोच्च धावसंख्या ऋषभ पंतने केली, ज्याने दुसऱ्या दिवशी अवघ्या ३३ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी केली.
तत्पूर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर पहिल्या डावात १८५ धावा केल्या. जेव्हा ऑस्ट्रेलियाची पाळी आली तेव्हा त्यांचे फलंदाजही फ्लॉप ठरले आणि १८१ धावांत गारद झाले, ज्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ ४ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली, पण फलंदाजांनी पुन्हा संघर्ष केला. मात्र, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने संघाला वेगवान सुरुवात करून दिली आणि ८व्या षटकातच ४२ धावा केल्या.
जैस्वालने २२ तर राहुलने १३ धावा केल्या. विराट कोहली आणि शुभमन गिलही स्वस्तात बाद झाले, पण ऋषभ पंतच्या शानदार खेळीने या सामन्यात भारताचे दमदार पुनरागमन केले. पंतने दुसऱ्या दिवशी अवघ्या ३३ चेंडूत ६१ धावा केल्या आणि या डावात ६ चौकार आणि ४ षटकारही मारले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ६ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी भारताला डावात आणखी फक्त १६ धावा जोडता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडने दुसऱ्या डावात एकूण ६ बळी घेतले. त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या आणि सामन्यात १० बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.