India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. मालिका सुरू होण्यास केवळ ४ दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी पर्थ येथे खेळली जाणार आहे. पण या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा बॉलिंग कोच डॅनियल व्हिटोरी संघासोबत नसणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा प्रशिक्षक म्हणून तो आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात सहभागी होणार आहे. आयपीएलचा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे.
डॅनियल व्हिटोरी हा क्रिकेट जगतातील अशा अद्वितीय प्रशिक्षकांपैकी एक आहे, जो एका फ्रँचायझीचा मुख्य प्रशिक्षक देखील आहे आणि आंतरराष्ट्रीय संघात सहाय्यक भूमिकाही बजावत आहे. २०२२ पासून तो अँड्र्यू मॅकडोनाल्डच्या नेतृत्वाखाली तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
त्याचा अनुभव लक्षात घेऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला फ्रँचायझी क्रिकेटमध्येही प्रशिक्षक करण्याची परवानगी दिली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रवक्त्याने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, आम्ही सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक म्हणून डॅनियलच्या भूमिकेचे समर्थन करतो. आयपीएल लिलावात सहभागी होण्यापूर्वी डॅन पहिल्या कसोटीची सर्व तयारी पूर्ण करेल. यानंतर तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी संघासोबत राहील. आयपीएल लिलावात सहभागी होण्यासाठी तो कसोटीच्या मध्यावर रवाना होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
डॅनियल व्हिटोरी सोमवारी ऑस्ट्रेलियन संघासोबत सरावासाठी वाका मैदानावर होता. त्याने गोलंदाजी युनिटशी जवळून काम केले. तसेच, रवींद्र जडेजाच्या चेंडूंचा सामना करण्यासाठी फलंदाजांना सराव करायला लावला.
दुसरीकडे, रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर चॅनलमध्ये समालोचक म्हणून काम करत आहेत. पण पाँटिंग पंजाब किंग्जचा प्रशिक्षक आहे आणि लँगर लखनौ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक आहे. या कारणास्तव, हे दोघेही लिलावात भाग घेण्यासाठी पर्थ कसोटी सोडून जेद्दाहला रवाना होणार आहेत.
संबंधित बातम्या