सध्या युएईमध्ये महिला टी-20 विश्वचषकाचाचा थरार सुरू आहे. या विश्वचषकाचा १४ वा सामना आज (११ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियन महिला संघाने हा सामना सहजतेने जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने हा सामना ९ गडी राखून जिंकला. सलग तिसऱ्या विजयातून ६ गुण घेत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याचा प्रबळ दावेदार ठरला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. टीम इंडियाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी आणखी मेहनत करावी लागणार आहे. भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा असणार नाही.
तत्पूर्वी आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा डाव १९.५ षटकांत ८२ धावांत गुंडाळला. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत एक विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.
टीम इंडिया सध्या अ गटातील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ग्रुप स्टेज संपल्यानंतर, अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करतील. अशा स्थितीत भारताला सेमी फायनल गाठणे खूप कठीण झाले आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर आहे.
टीम इंडियाला आपला शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवावा लागेल. याशिवाय नेट रन रेटही चांगला ठेवावा लागेल. तरच भारतीय संघ सहज उपांत्य फेरी गाठू शकेल.
जर टीम इंडियाचा शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला. त्यानंतरही भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे. या सामन्याचा निकालही भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा असेल.
जर किवी संघाने हा सामना जिंकला आणि न्यूझीलंडने श्रीलंकेलाही पराभूत केले तर टीम इंडियाच्या अडचणींमध्ये लक्षणीय वाढ होईल. भारताला इच्छा असूनही उपांत्य फेरी गाठता येणार नाही. या दोन सामन्यांपैकी किमान एक सामना न्यूझीलंडने गमवावा तसेच, त्यांचा नेट रन रेटही भारतापेक्षा वाईट असावा, अशी प्रार्थना हरमनप्रीत कौर आणि संघाला करावी लागेल.