डेव्हिड वॉर्नर याच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन संघात स्टीव्ह स्मिथच्या निवृत्तीची अटकळ बांधली जात होती, मात्र आता या अनुभवी फलंदाजाने खुलासा केला आहे की, क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट सोडण्याचा त्याचा कोणताही विचार नाही.
३५ वर्षीय स्टीव्ह स्मिथने अलीकडेच सिडनी सिक्सर्ससोबत ३ वर्षांचा करार केला असून, पुढील काही वर्षांसाठी क्रिकेटचा सर्वात लहान फॉरमॅट म्हणजेच T20 क्रिकेट सोडण्याचा त्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
स्टीव्ह स्मिथ कसोटीतील एक महान फलंदाज आहे, पण तो अद्याप टी-20 क्रिकेटमध्ये स्वत:ला स्थापित करू शकला नाही. या वर्षी खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकातही त्याला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळवता आले नव्हते. असे असूनही स्मिथ तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. स्मिथ म्हणाला की, निवृत्ती घेण्याचा त्याचा अद्याप कोणताही विचार नाही.
या क्षणी त्याला फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. तो म्हणाला की मला खूप बरे वाटत आहे आणि मी या उन्हाळ्याच्या हंगामाची वाट पाहत आहे. या वर्षी काही (BBL) सामने खेळण्याची संधी मिळेल असे सांगून त्याने प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेण्याची उत्सुकता व्यक्त केली.
स्मिथचे कसोटी क्रिकेटमधील भवितव्य देखील चर्चेचा विषय बनले आहे, कारण गेल्या उन्हाळ्यात पाकिस्तान मालिकेनंतर डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतरच्या वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत स्मिथला टेस्टमध्ये सलामीवीर बनवण्यात आले. पण त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. त्याने ८ डावात २८.२५ च्या सरासरीने १७१ धावा केल्या, जे त्याच्या कारकिर्दीतील ५६.८७ च्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.
तथापि, पर्थ स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या आगामी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्मिथ सलामीवीर म्हणून खेळतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
पण यावर स्मिथने सूचित केले की त्याला पुन्हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल. तो म्हणाला की उस्मान ख्वाजा त्याला पुन्हा चौथ्या क्रमांकावर खेळताना बघू इच्छितो आणि मार्नस लॅबुशेनलाही असेच वाटते. तो म्हणाला की मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे.