Ind vs Aus U19 WC Final : भारतीयांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा, ऑस्ट्रेलियाने अंडर-१९ वर्ल्डकप जिंकला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Aus U19 WC Final : भारतीयांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा, ऑस्ट्रेलियाने अंडर-१९ वर्ल्डकप जिंकला

Ind vs Aus U19 WC Final : भारतीयांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा, ऑस्ट्रेलियाने अंडर-१९ वर्ल्डकप जिंकला

Feb 11, 2024 09:08 PM IST

U19 World Cup final 2024 : ऑस्ट्रेलियाने अंडर-१९ विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघ चौथ्यांदा चॅम्पियन बनला आहे. त्याचवेळी भारताचे सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.

U19 World Cup final 2024 India vs Australia
U19 World Cup final 2024 India vs Australia

U19 World Cup Final Ind vs Aus  : अंडर १९ वर्ल्डकपच्या (U19 World Cup 2024) फायनलमध्ये भारताचा पराभव झाला आहे. आज रविवारी (११ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी येथील विलोमूर पार्क स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ७९ धावांनी धुळ चारली.

ऑस्ट्रेलियन संघ चौथ्यांदा अंडर-१९ वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. त्याचवेळी भारताचे सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.

अंडर १९ वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतासमोर २५४ धावांचे लक्ष्य होते. पण संपूर्ण संघ ४३.५ षटकात १७४ धावांवर गारद झाला. भारतीय फलंदाज सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसले. सलामीवीर आदर्श सिंग व्यतिरिक्त आघाडीच्या फळीतील इतर फलंदाजांनी चांगलीच निराशा केली.

भारताने १२२ धावांवर ८ विकेट्स गमावल्या होत्या. तेव्हा भारताचा पराभव मोठ्या अंतराने होईल असे वाटत होते. मात्र मुरुगन अभिषेकने उपयुक्त खेळी खेळून भारताला दीडशेच्या पुढे नेले. मुरुगन अभिषेकने ४२ धावा केल्या. 

तर सलामीवीर आदर्श सिंगच्या बॅटमधून सर्वाधिक ४७ धावा आल्या. यानंतर केवळ मुशीर खान यालाच दुहेरी आकडा गाठता आला. त्याने २२ धावा केल्या.

तर ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज महाली बियर्डमन आणि फिरकी गोलंदाज राफे मॅकमिलनने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर वेगवान गोलंदाज कॅलम वाइडरने २ विकेट मिळवले. चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रेकर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा डाव

तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर सॅम कॉन्स्टास स्वस्तात बाद झाला. कॉन्स्टन्स शुन्यावर राज लिंबानीचा बळी ठरला. यानंतर कर्णधार ह्यू वेग्बेन आणि हॅरी डिक्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करत डाव सांभाळला.

पण यानंतर नमन तिवारीने या दोन्ही खेळाडूंना बाद केले. हॅरी डिक्सननेही ४२ धावा केल्या तर ह्यू वेग्बेन ४८ धावांवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियाने ९९ धावांमध्ये ३ विकेट गमावल्या होत्या, तेथून भारतीय वंशाचा खेळाडू हरजस सिंग आणि रायन हिक्स यांनी मिळून ६६ धावा जोडल्या. हिक्सला वेगवान गोलंदाज राज लिंबानीने बाद केले. तर हरजस सिंग फिरकीपटू सौमी पांडेचा बळी ठरला. शेवटी ऑलिव्हर पीकने नाबाद ४६ धावा करत ऑस्ट्रेलियाला २५० च्या पुढे नेले.

भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले तर नमन तिवारीने २ बळी घेतले. याशिवाय सौम्या पांडे आणि मुशीर खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या