मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाने कमाल केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानने वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करत यजमान संघाला अवघ्या १४० धावांत गारद केले आहे. पाकिस्तानला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी १४१ धावा करायच्या आहेत.
पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी अगदी बरोबर ठरवला आणि पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर धुमाकूळ घातला. ऑस्ट्रेलियन फलंदाज नसीम शाह आणि हरिस रौफसमोर फ्लॉप ठरले.
ऑस्ट्रेलियाकडून शॉन अॅबॉट याने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर मॅथ्यू शॉर्टने २२ धावांचे योगदान दिले. यानंतर कोणताच ऑस्ट्रेलियन फलंदाज २० धावांच्या पुढे जाऊ शकला नाही.
तीन सामन्यांची ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ मालिका जिंकण्याच्या मार्गावर आहे.
पाकिस्तानकडून नसीम शाह आणि शाहिन आफ्रिदी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. हारिस रौफला दोन तर मोहम्मद हसनैन याला एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला जॅक फ्रेझर मॅकगर्क फ्लॉप ठरला. त्याला नसीम शाहने बाद केले. एका चौकाराच्या जोरावर त्याला ९ चेंडूत केवळ ७ धावा करता आल्या.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेला ॲरॉन हार्डीही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. हार्दिकला शाहीन आफ्रिदीने बाद केले. तो १३ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ३६ धावांत २ गडी बाद झाल्यानंतर कांगारूंना कर्णधार जोश इंग्लिसकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्याने पुन्हा एकदा निराशा केली.
जोश इंग्लिश १९ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने ७ धावा करून बाद झाला. नसीम शाहने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हारिस रौफने सेट झालेल्या मॅथ्यू शॉर्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ३० चेंडूत २२ धावा करून तो बाद झाला.
टॉप ऑर्डर पूर्ण फ्लॉप झाल्यानंतर शेवटची आशा मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून होती. पण हे दोन दिग्गजही पाकिस्तानी गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. २५ चेंडूत ८ धावा करून स्टॉइनिस बाद झाला तेव्हा मॅक्सवेल शुन्यावर बाद झाला.