भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी फॉरमॅटचा फॉर्म सध्या चांगला नाही. अलीकडेच न्यूझीलंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा ३-० ने पराभव केला होता. या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे नुकसान सहन करावे लागले. टीम इंडियाला गुणतालिकेत अव्वल स्थान गमवावे लागले.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला आता २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळायची आहे. या ट्रॉफी अंतर्गत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेला अजून काही कालावधी बाकी असला तरी भारतीय अ संघाला मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
वास्तविक, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजेच एमसीजी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा ६ गडी राखून पराभव केला. भारताचा पहिला डाव १६१ धावांवर आटोपला. ध्रुव जुरेल वगळता एकही फलंदाज चालला नाही. जुरेलने ८० धावांची खेळी खेळली.
यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने २२३ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघाने थोडी चांगली कामगिरी केली पण ती अपुरी ठरली. यावेळीही ध्रुव जुरेलने सर्वाधिक ६८ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात २२९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य दिले होते.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरुवातीला गडगडला पण नंतर सॅम कोन्स्टासच्या नाबाद ७३ आणि ब्यू वेबस्टरच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर सहा विकेट्स शिल्लक राहून लक्ष्य गाठले.
अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया अ संघाने २ अनधिकृत सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा २-० असा व्हाईटवॉश केला. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारताचा ७ विकेट्सने पराभव केला होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारत अ संघाच्या या पराभवामुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये आहे.
या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांना BGT पूर्वी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले जेणेकरून ते दोघेही काही तयारी करू शकतील. पण केएल राहुलने दोन्ही डावात निराशा केली तर ज्युरेलने दोन्ही डावात शानदार अर्धशतके झळकावली. पहिल्या डावात तो शतकापासून अवघ्या २० धावा दूर राहिला.