ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आज (११ फेब्रुवारी) ग्लेन मॅक्सेवलने वादळी शतक ठोकले आहे. मॅक्सवेलच्या टी-20 करिअरचे हे पाचवे शतक ठरले.
मॅक्सवेलने ५५ चेंडूत १२० धावांची नाबाद खेळी केली. या डावात मॅक्सवेलने १२ चौकार आणि ८ षटकारांचा पाऊस पाडला. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या भूमीवर टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून २४१ धावांचा डोंगर उभारला. मॅक्सवेलच्या या शतकासोबतच अनेक मोठे विक्रमही झाले.
ग्लेन मॅक्सवेलचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पाचवे शतक आहे. यासह त्याने भारताचा महान फलंदाज रोहित शर्माची बरोबरी केली आहे.
इतकेच नाही तर मॅक्सवेलने सर्वात जलद म्हणजेच सर्वात कमी डावात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याचाही विक्रम केला आहे. मॅक्सवेलने आपल्या ९४व्या डावात पाचवे टी-20 शतक पूर्ण केले तर रोहितने १४३ डावात ही कामगिरी केली. यानंतर भारताच्या सूर्यकुमार यदवचे ५७ डावात ४ टी-20 शतके आहेत.
याशिवाय ग्लेन मॅक्सवेलचा टी-20 इंटरनॅशनलमधील हा दुसरा सर्वोच्च स्कोर आहे. मॅक्सवेलची या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या १४५ धावा आहे, जी त्याने श्रीलंकेविरुद्ध ६५ चेंडूत केली होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मॅक्सवेल टी-20 मध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला आहे.
या बाबतीत मॅक्सवेलने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. यादवने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ११७ धावांची खेळी केली होती.
यानंतर ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या क्रमांकावरदेखील मॅक्सवेलच आहे. मॅक्सवेलने २०१९ मध्ये भारताविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद ११३ धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात मॅक्सवेलने झंझावाती शतक झळकावलेच पण ऑस्ट्रेलियन संघाने घरच्या मैदानावर सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विक्रमही केला.