
David Warner, AUS vs PAK 2nd Test : ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानसोबत मायदेशात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. ही मालिका डेव्हिड वॉर्नरची शेवटची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात असून, वॉर्नरने त्याचा शेवटचा कसोटी डाव मेलबर्नच्या मैदानावर खेळला आहे.
डेव्हिड वॉर्नर मेलबर्न कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अवघ्या ६ धावांवर बाद झाला. बाद होऊन तंबूत परतत होता, तेव्हा मेलबर्नच्या प्रेक्षकांनी वॉर्नरला स्टँडिंग ओव्हेशन दिले आणि वॉर्नरनेही त्यांचा निरोप घेतला. ड्रेसिंग रूममध्ये जाताना वॉर्नरने आपले बॅटिंग ग्लोव्हज मैदानावर उपस्थित असलेल्या एका छोट्या चाहत्याला दिले.
डेव्हिड वॉर्नर मेलबर्नच्या मैदानावरील शेवटचा कसोटी डाव खेळून ड्रेसिंग रूममध्ये परतत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा कसोटी सामना सिडनीत खेळवला जाणार आहे. सिडनी कसोटी डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी करिअरचा शेवटचा सामना असणार आहे.
डेव्हिड वॉर्नरने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत वॉर्नरने एकूण ३७१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि ४२.४७च्या सरासरीने एकूण १८ हजार ५२१ धावा केल्या आहेत. यावॉर्नरने एकूण ४९ आंतरराष्ट्रीय शतके आणि ९३ अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वात मोठी खेळी नाबाद ३३५ धावा आहे.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिकी पॉंटिंग पहिल्या नंबरवर आहे. डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या नंबरवर आहे. पॉंटिगने तिन्ही फॉरमॅटमध्ये ७० शतकांच्या मदतीने एकूण २७,३६८ धावा केल्या.
३७ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ११० सामने खेळले असून यातील २०१ डावांमध्ये त्याने ४४.८२ च्या सरासरीने आणि ७०.४७ च्या स्ट्राइक रेटने एकूण ८ हजार ६५१ धावा केल्या आहेत. त्याने कसोटी प्रकारात २६ शतके आणि ३६ अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ३३५ धावा आहे.
संबंधित बातम्या
