काही दिवसांतच आयपीएलच्या २०२५ च्या मोसमासाठी खेळाडूंचा बाजार भरणार आहे, तर दुसरीकडे खेळाडूदेखील मोठ्या रकमेची बोली लागावी यासाठी जीवाचं रान करत आहेत.
अशातच ऑस्ट्रेलियन संघाचा विध्वंसक अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस याने पाकिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी करत २७ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार खेचून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्टोइनीसने ऑस्ट्रेलियाला तिसरा टी-20 अवघ्या ११.२ षटकांत जिंकून दिला. यादरम्यान त्याने शाहीन आफ्रिदीच्या एका षटकात एकूण २५ धावा केल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान क्रिकेट संघाने १८.१ षटकांत सर्वबाद ११७ धावा केल्या. त्यांच्यासाठी माजी कर्णधार बाबर आझमने २८ चेंडूत ४१ धावांची सर्वोच्च खेळी केली आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले.
मात्र, पाकिस्तानचे इतर फलंदाज सुपर फ्लॉप ठरले. ऑस्ट्रेलियाकडून ॲरॉन हार्डीने सर्वाधिक ३ तर स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झाम्पाने २-२ विकेट घेतल्या.
पाकिस्तानच्या या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का मॅथ्यू शॉर्ट (२) च्या रूपाने १६ धावांवर बसला, तर जेक फ्रेझर मॅकगर्क (१८) सांघिक धावसंख्या ३० वर बाद झाला.
यानंतर जोश इंग्लिस (२७) आणि मार्कस स्टॉइनिस यांनी स्फोटक फलंदाजी सुरू केली. या दोघांनी संघाला ८५ धावांपर्यंत नेले. इंग्लिस २४ चेंडूत ४ चौकार मारून पॅव्हेलियनमध्ये परतला, पण स्टॉइनिसची स्फोटक फलंदाजी सुरूच राहिली.
या दरम्यान ११ वे षटक टाकायला आलेल्या शाहीन आफ्रिदीच्या या षटकात स्टोईनीसने ३ षटकार आणि १ चौकार मारून २५ धावा वसूल केल्या. त्याने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर पाकिस्तानला ११.२ षटकांत पराभव पत्करावा लागला. स्टॉइनिसने २७ चेंडूत ६१ धावा करून नाबाद राहिला, तर टीम डेव्हिडने ७ धावा करून नाबाद राहिला.