टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन्ही संघात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेड येथे खेळला जाणार आहे. या कसोटीसाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. पण या तयारीदरम्यान टीम इंडियासोबत एक वाईट घटना घडली आहे.
या घटनेनंतर कसोटी मालिकेतील भारताच्या सराव सत्र पाहण्यास चाहत्यांना परवानगी दिली जाणार नाही. खरे तर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघाच्या सरावादरम्यान काही प्रेक्षकांच्या 'अशोभनीय' कमेंटमुळे खेळाडू त्रस्त झाले होते.
मंगळवारी भारतीय खेळाडूंचे सराव सत्र चाहत्यांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचे सराव सत्र पाहण्यासाठी मर्यादित संख्येने प्रेक्षक आले होते, पण टीम इंडियाचा सराव पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. ॲडलेडमधील सराव सुविधा प्रेक्षकांच्या गॅलरीच्या अगदी जवळ आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'हा संपूर्ण गोंधळ होता. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षण सत्रादरम्यान ७० पेक्षा जास्त लोक आले नाहीत, परंतु भारतीय सत्रादरम्यान सुमारे ३००० लोक उपस्थित होते.
इतके चाहते येतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती, 'सिडनीमध्ये (पाचव्या कसोटीपूर्वी) आणखी फॅन्स डे होता, पण तो रद्द करण्यात आला आहे कारण येथे केलेल्या असभ्य आणि असंवेदनशील टिप्पण्यांमुळे खेळाडू खूप दुखावले गेले आहेत.'
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चाहते रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांना वारंवार षटकार मारण्यास सांगत होते. काही चाहत्यांनी संघातील खेळाडूंच्या फिटनेसवर असभ्य कमेंट्स केल्या.
तर काही लोक त्यांच्या मित्रांसोबत फेसबुक लाईव्ह करत होते आणि फलंदाज खेळत असताना मोठमोठ्याने बोलत होते.
यानंतर 'एक चाहता एका खेळाडूला गुजरातीमध्ये 'हाय म्हणण्याची विनंती करत होता. आणखी एकजण खेळाडूच्या शरीराबद्दल असभ्य कमेंट करत होता".
या मालिकेतील पुढील सामने ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ७ जानेवारीला संपणार आहे.
संबंधित बातम्या