Asian Games : एका चेंडूत ४ धावा हव्या होत्या, बांगलादेशी फलंदाजाने चौकार मारला, पाकचं कांस्य पदकही हुकलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Asian Games : एका चेंडूत ४ धावा हव्या होत्या, बांगलादेशी फलंदाजाने चौकार मारला, पाकचं कांस्य पदकही हुकलं

Asian Games : एका चेंडूत ४ धावा हव्या होत्या, बांगलादेशी फलंदाजाने चौकार मारला, पाकचं कांस्य पदकही हुकलं

Published Oct 07, 2023 02:27 PM IST

BAN vs PAK asian games 2023 : बांगलादेश क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा 2023 च्या पुरुष क्रिकेट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव करून पदक जिंकले. एका चेंडूत ४ धावा हव्या असताना बांगलादेशी फलंदाजाने चौकार लगावला.

asian games 2023
asian games 2023

Bangladesh Wins Bronze in Cricket asian games 2023 : आशियाई क्रीडा २०२३ च्या पुरुष क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने कांस्यपदकही गमावले आहे. आज (७ ऑक्टोबर) तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला. बांगलादेशने डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव करून कांस्यपदक जिंकले.

चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या हा सामना पावसामुळे प्रभावित झाला. सामन्यादरम्यान पाऊस आणि नंतर ओले मैदान यामुळे बराच वेळ वाया गेला. यामुळे सामना अधिकाऱ्यांना षटके कमी करावी लागली.

यानंतर बांगलादेशचा कर्णधार सैफ हसनने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी २८ चेंडूत ४७ धावा जोडल्या. या एकूण धावसंख्येवर खुशदिल शाह (१४) बाद झाला. यानंतर आणखी दोनच चेंडू टाकण्यात आले, तेव्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला. यावेळी पाकिस्तानची धावसंख्या ५ षटकात एक विकेट गमावून ४८ धावा होती.

पाऊस थांबल्यावरही बराच वेळ वाया गेला होता. अशा परिस्थितीत सामना अधिकाऱ्यांनी थेट बांगलादेशला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशला ५ षटकांत ६५ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात बांगलादेशी संघाने पहिल्या दोन विकेट अवघ्या एका धावेवर गमावल्या होत्या.

अर्शद इक्बालने पहिल्या तीन चेंडूत झाकीर हसन (०) आणि सैफ हसन (०) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. येथून अफिफ हुसेन (२०) आणि यासिर अली (३४) यांनी शानदार फलंदाजी करत बांगलादेशला विजयाच्या मार्गावर आणले. यानंतर अफिफही अर्शद इक्बालचा बळी ठरला. तर यासिर अलीला सुफियान मुकीमने बाद केले.

शेवटच्या चेंडूवर ४ धावा हव्या होत्या

बांगलादेशला २ चेंडूत ४ धावांची गरज असताना यासिर अलीची विकेट पडली. अशा परिस्थितीत आता बांगलादेशला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज होती. रकीबुल हसनने हे काम चोख बजावले. त्याने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून बांगलादेशला कांस्यपदक मिळवून दिले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या