आशिया कप २०२३ या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आणि श्रीलंका भूषवणार असून त्यात ६ संघ भाग घेतील. भारत, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ आशिया कप खेळणार आहेत. यंदाचा आशिया कप एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर पाकिस्तान संघाची कमान बाबर आझमच्या हातात आहे. भारतीय संघात विराट कोहली आणि रविंद्र जडेजा सारखे भरवशाचे खेळाडू आहेत. तर पाकिस्तानी संघातही बाबर आझमशिवाय शादाब खान आणि फखर जमानसारखे मॅचविनर खेळाडू आहेत. जे कोणत्याही परिस्थितीत सामना आपल्या दिशेने फिरवण्याची क्षमता ठेवतात. पाकिस्तानी संघात वेगवान गोलंदाजांची फौज आहे. त्यांच्याकडे शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ यांसारखे तगडे गोलंदाज आहेत. तर भारतीय संघात जसप्रीत बुमराह परतल्याने गोलंदाजीची ताकद वाढली आहे.
यावर्षी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे हा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. भारत आणि पाकिस्ताननंतर या स्पर्धेत श्रीलंका तिसरा बलाढ्य संघ आहे. यानंतर अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ आहेत. श्रीलंका संघाची कमान दासून शनाकाच्या हाती आहे. श्रीलंकेच्या संघातही दिग्गजांची फौज आहे. तसेच, बांगलादेशचा संघदेखील अनेकवेळा आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. पण त्यांना एकदाही जेतेतपद मिळवता आलेले नाही. बांगलादेशकडे शाकिब अल हसनसारखा अनुभवी खेळाडू आहे. तर अफगाणिस्तानकडे राशीद खान, इब्राहिम झादरान यांसारखे दर्जेदार खेळाडू आहे. या आशिया कपमध्ये नेपाळचा संघही सहभागी होणार आहे. नेपाळसाठी ही पहिलीच सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. नेपाळचे प्रदर्शन कसे असेल याकडेही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.