Shahid Afridi on Shaheen Afridi : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याचा जावई शाहीन आफ्रिदीला जाहीरपणे फटकारले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने खूपच निराशाजनक गोलंदाजी केली. त्यामुळे शाहीद आफ्रिदीने शाहीनवर नाराजी व्यक्त केली. सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानला भारताकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
रोहित सेनेने पाकिस्तानला २२८ धावांनी धूळ चारली. भारताकडून विराट कोहली, केएल राहुल यांनी शतके झळकावली तर कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या होत्या.
भारताने पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध ३५६ धावा ठोकल्या. पाकिस्तानसमोर ३५७ धावांचे मोठे लक्ष्य होते, मात्र भारतीय संघाने पाकिस्तानला ३२ षटकांत ८ बाद १२८ धावांवर रोखले. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजीला आले नाहीत.
आता एका मुलाखतीदरम्यान गोलंदाजांच्या कामगिरीवर शाहिद आफ्रिदी म्हणाला की, शाहीनला त्याच्या लाईन आणि लेंथमध्ये सातत्य राखावे लागेल.
शाहीनचा सासरा पुढे म्हणाला की, 'जर तुम्ही पहिल्या २ ओव्हरमध्ये विकेट घेऊ शकत नसाल तर तुम्ही स्वतःवर रागावू शकत नाही. तुम्ही कारणेही सांगू शकत नाही. खेळपट्टी चांगली होती पण गोलंदाजी चांगली नव्हती. शाहीनने नसीम शाहच्या लाईन आणि लेंथनुसार गोलंदाजी का केली नाही."
नाणेफेक जिंकल्यानंतर संघाने प्रथम फलंदाजी का निवडली नाही, या चाहत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तरही शाहिद आफ्रिदीने दिले. तो म्हणाला, जर आपण योग्य गोलंदाजी केली असती, जसे नसीम शाहने डावाच्या सुरुवातीला केली, तर बाब वेगळी असती. शाहीननेही नसीमप्रमाणे गोलंदाजी करायला हवी होती, पण त्याची लाईन आणि लेन्थ बरोबर नव्हती".