Asia Cup SL vs IND FINAL : भारतीय महिलांचा ‘विजयरथ’ रोखला, श्रीलंकेने आशिया चषक जिंकला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Asia Cup SL vs IND FINAL : भारतीय महिलांचा ‘विजयरथ’ रोखला, श्रीलंकेने आशिया चषक जिंकला

Asia Cup SL vs IND FINAL : भारतीय महिलांचा ‘विजयरथ’ रोखला, श्रीलंकेने आशिया चषक जिंकला

Jul 28, 2024 11:08 PM IST

Women's Asia Cup final: कर्णधार चमारी अट्टापट्टू तसेच हर्षिता समरविक्रमाच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने गतविजेत्या भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत पहिल्यांदाच महिला आशिया चषकावर नाव कोरले.

श्रीलंकन महिला संघाने आशिया चषक जिंकला
श्रीलंकन महिला संघाने आशिया चषक जिंकला (PTI)

भारतीय महिलांचा विजयरथ रोखत श्रीलंकेच्या महिला संघाने अखेर आशिया चषकावर नाव कोरले आहे. याआधी पाचवेळा अंतिम सामन्यात धडक देऊनही त्यांना विजेतेपद मिळवता आले नव्हते. यंदा यंदा यजमान श्रीलंका संघाने बलाढ्य भारतीय संघाला पराभवाची धूळ चारत विजेतेवद पटकावले. भारताने दिलेले १६६ धावांचे आव्हान श्रीलंकेच्या महिलांनी सहज पार करत ८ विकेट्स व ८ चेंडू राखून दिमाखदार विजय मिळवला.

अखेरच्या काही षटकांमध्ये कविषा दिलहारीने ३० धावांची स्फोटक खेळी करत विजयावर  शिक्कामोर्तब केले. श्रीलंकेने १८.४ षटकांत २ बाद १६७ धावा करत विजयी लक्ष्य गाठले.  भारताकडून दीप्ती शर्माला एक बळी मिळाला. श्रीलंकेची सलामीवीर विष्मी गुणरत्ने धावबाद झाली.

कर्णधार चमारी अट्टापट्टू तसेच हर्षिता समरविक्रमाच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने गतविजेत्या भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत पहिल्यांदाच महिला आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे. भारताला शेवटचा २०१८ मध्ये क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

१६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेने अट्टापट्टू ६१ व समरविक्रमाच्या नाबाद ६९ धावांच्या बळावर  १८.४ षटकांत दोन बाद १६७ धावा करत सामना जिंकला. अट्टापट्टू आणि समरविक्रमा यांनी ८७ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला.   अट्टापट्टूने  मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. 

तत्पूर्वी स्मृती मंधानाच्या अर्धशतकामुळे (६० धावा)  भारताने ६ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारली होती. जेमिमा रॉड्रिग्जने २९ तर ऋचा घोषने ३० धावांचे योगदान दिले.  श्रीलंकेच्या  फिरकीपटूंचा मारा यशस्वी परतवून लावला.  श्रीलंकेच्या गोलंदाजांनी संथ खेळपट्टीचाही चांगला वापर करत भारतीय फलंदाजांना जखडून टाकले. 

यंदाची आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत पार पडली. महिलांच्या आशिया चषक स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते. उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून फायनलमध्ये धडक दिली होती. आतापर्यंत झालेल्या महिला आशिया चषकात भारतीय संघाने सर्वाधिक सातवेळा विजेतेपद मिळवले आहे. बांगलादेशने एकदा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने सहावेळा अंतिम सामने खेळून अखेर यावेळी विजेतेपद मिळवण्यात यश मिळवले.

 

Whats_app_banner