Asia Cup Opening Ceremony : आशिया कपला उद्या बुधवारपासून (३० ऑगस्ट) पाकिस्तानमध्ये सुरुवात होणार आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभही आयोजित केला जाणार आहे.
या स्पर्धेतील १३ पैकी ४ सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर उर्वरित ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. आशिया कपचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळवला जाईल. तर भारतीय संघ २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याच मैदानावर भारताचा दुसरा सामना ४ सप्टेंबरला नेपाळशी होणार आहे.
आशिया कपमध्ये यावेळी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ खेळणार आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर-४ मध्ये जातील. तेथून दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
आशिया कपचा उद्घाटन सोहळा बुधवारी (३० ऑगस्ट) होणार आहे. पाकिस्तान-नेपाळ यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा रंगणार आहे.
आशिया कपचा उद्घाटन सोहळा पाकिस्तानातील मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. त्याआधी उद्घाटन सोहळा होणार आहे.
आशिया कपचा उद्घाटन सोहळा तसेच, सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटर्वकवर दिसणार आहेत. त्याच वेळी, विनामूल्य डीटीएच वापरणारे प्रेक्षक डीडी स्पोर्ट्सवर भारताचे सामने पाहू शकतील. या वाहिनीवर अंतिम सामनाही प्रसारित केला जाणार आहे.
आशिया कपचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात हॉटस्टारवर उपलब्ध असेल. चाहते त्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकतात.
संबंधित बातम्या