jay shah announce prize money for groundsmen & curators : आशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यातआधी एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
जय शाह यांनी श्रीलंकेतील ग्राउंड स्टाफला मोठी बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली आहे. आशिया चषक २०२३ मध्ये बहुतेक सर्वच सामन्यांमध्ये पावसाने अडथळा आणला. पण असे असूनही, पाऊस थांबताच मैदान खेळण्यासाठी सज्ज ठेवण्यात ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्स यांनी खूप मेहनत घेतली. आता त्यांच्या कामावर खूश होऊन आशियाई क्रिकेट परिषद आणि श्रीलंका क्रिकेटने त्यांना बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली आहे.
यामध्ये, कॅंडी आणि कोलंबोच्या ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्सना एकूण ५० हजार डॉलर्स बक्षीस रक्कम म्हणून दिली जाईल, याची माहिती स्वतः ACC अध्यक्ष जय शाह यांनी ट्विट करून दिली.
भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर आशिया चषक प्रथमच हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पाकिस्तानमध्ये ४ सामने तर फायनलसह ९ सामने श्रीलंकेतील कॅंडी आणि कोलंबो येथे खेळले गेले. या काळात खराब हवामानामुळे सामन्यांमध्ये अनेक व्यत्यय आला.
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामना पावसामुळे राखीव दिवशी पूर्ण होऊ शकला. या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. अशा परिस्थितीत ग्राऊंडसमनने आपल्या मेहनतीने त्या दिवशीही मैदान खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज ठेवले होते.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राऊंड स्टापचे कौतुक केले होते. प्रेमदासाच्या ग्राउंड स्टाफने सलग दोन दिवस पाऊस असूनही मैदान खेळण्यासाठी तयार ठेवले. याशिवाय खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजीसाठीही चांगली दिसत होती.