Team India News : भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, अश्विनची निवृत्ती ही फक्त टीम इंडियातील बदलाची सुरुवात आहे. येत्या काळात अनेक दिग्गज खेळाडू क्रिकेटला निरोप देऊन नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देतील, असा अंदाज बांधला जात आहे.
'क्रिकबज'नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. पुढील वर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याच्या आधी टीम इंडियातील बदलाची सुरुवात होऊ शकते. ऑस्ट्रेलियात सुरू असलेली बॉर्डर-गावस्कर करंडक ही डब्ल्यूटीसी चक्रातील भारताची शेवटची मालिका आहे आणि भारतीय संघातील जुन्या पिढीसाठी ही शेवटची मालिका असू शकते, असं या वृत्तात म्हटलं आहे.
अश्विनसह विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांनी देखील २०१२ ते २०१३ मध्ये टीम इंडियात झालेल्या अशाच बदलांच्या काळात कोअर प्लेयर म्हणून आपलं स्थान निर्माण केलं होतं. त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी आपापल्या जागा रिकाम्या केल्या होत्या.
चांगली कामगिरी करणाऱ्यांसाठी भारतीय संघाचे 'दरवाजे खुले आहेत', असं कर्णधार रोहित शर्मा वारंवार सांगत असला तरी चेतेश्वर पुजारा आणि रहाणेपासून टीम इंडिया बरीच पुढं गेल्याचं दिसत आहे. तसं आधीच ठरलं होतं. अश्विनलाही असेच काही संकेत मिळाले, कारण वॉशिंग्टन सुंदरनं अचानक न्यूझीलंड मालिकेत प्रवेश केला आणि पर्थ कसोटीत त्याला जडेजा आणि अश्विनच्याही वर संधी देण्यात आली.
क्रिकबजच्या वृत्तानुसार, अश्विनचा निवृत्तीचा निर्णय किती नियोजनबद्ध होता हे निश्चित सांगणं कठीण आहे, परंतु भारतीय संघ लवकरच बदल करण्याची अपेक्षा आहे, शक्यतो २०२५ च्या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये त्याची पुढील कसोटी मालिका सुरू होईपर्यंत हे बदल होतील. अश्विनची निवृत्ती हा इतरांसाठी संकेत आहे. उघडपणे हे कोणी मान्य करणार नाही, मात्र २००८ मध्ये अनेक वरिष्ठ खेळाडू अशाच पद्धतीनं निवृत्त झाले होते हेही लक्षात घ्यावं लागणार आहे.
संबंधित बातम्या